मुंबई : राज्यभरात पाऊस चांगला बरसत असून आज कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टी झाली आहे. तर मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आजही पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
नागपूर
नागपुरात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं. पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यानं एका बाजूची वाहतूक बंद पडली होती. पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेला रस्तात गुडघाभर पाणी साचून गाड्या बंद पडल्या होत्या. वाहन चालकांना मदतीसाठी काही तरुण रस्त्यावर उतरले होते.
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूय..कोरपना तालुक्यातील धानोली इथे बारा ते पंधरा घरात पुराचे पाणी शिरलं. यात घरातील अन्नधान्य आणि इतर सामानाचं नुकसान झालंय. तर ब्रम्हपुरी तालुक्यात अड्याळ जानी येथे वीज पडून मासेमारी करणाऱ्याचा मृत्यू झाला. तर सावली शहरातही घरांचं नुकसान झालं.
वर्धा
वर्धा शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातील नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. काही भागांत पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं मोठं नुकसान झालं. भाजी मार्केटमध्येही गुढगाभर पाणी साचलं.
वर्ध्यात देवळी तालुक्यात चोंढी गावात काही विद्यार्थी आणि शेतमजूर नाल्याच्या पलीकडच्या बाजूला अडकले होते. वर्ध्यात २४ तासांपेक्षा जास्त काळ पाऊस पडतोय. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अशातच विद्यार्थी आणि मजूर नाल्याच्या पलीकडच्या बाजूला अडकले होते. गावकरी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलंय.
हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री 10 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. वसमत तालुक्यातील 5 महसुल मंडळांत, पुरामुळे 19 हजार 197 शेतक-यांच्या 14 हजार 908 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. तर 163 घरांचंही नुकसान झालं. 162 जनावरं पुरात वाहून गेली.
हिंगोली जिल्ह्यातल्या कुरूंद गावात नदीचं पाणी शिरल्यानं गावक-यांचं अतोनात नुकसान झालंय. पुरग्रस्तांना कोणतीही मदत मिळत नसल्यानं हेमंत पाटील यांनी वसमतच्या तहसीलदारांची फोनवरून चांगलीच कानउघाडणी केली. पूरग्रस्तांना तात्काळ अन्न-धान्याचं वाटप करा अशा सूचनाही त्यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.