मुंबई : अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करीत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने महाराष्ट्रातही काही भागात पावसाची शक्यता आहे. यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला.
पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असले तरी, विदर्भातील अमरावती आणि अकोल्यात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.
पंढरपूर शहरात जोरदार दुपारी जोरदार वादळी वारे सुटले. यामुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उडले. काही ठिकाणी झाडं तसंच फांद्या मोडून पडल्या. पंढरपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घातलेला मंडपही या वा-यांमुळे उडून गेला. पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
यवतमाळच्या उमरखेड, महागाव तालुक्यात आज सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. उन्हाचा पारा सातत्यानं 44 ते 45 अंशावर चढत असल्यामुळे पावसाच्या सरीनं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात अन्य तालुक्यात देखील सकाळपासून ढगाळी वातावरण आहे.
नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नांदेडसह हदगाव आणि अर्धापूर तालुक्यात मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झालं असून, बहुतांश तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. तसंच या पावसामुळे मशागतीच्या कामाला वेग येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. ग्रामीण भागातही सायंकाळी अनेक ठिकाणी सरी कोसळल्या.. सकाळपासूनच या भागात ढगाळ वातावरण होते. खरीपासाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
आसाममध्ये पुराची भीषण परिस्थिती कायम आहे. या पुराचा 27 जिल्ह्यातील 6 लाख 62 हजार नागरिकांना फटका बसला असून, आतापर्यंत 9 जणांच्या मृत्यूची नोंद झालीय. तर 1 जण बेपत्ता आहे. 1 हजार 413 गावं अद्यापही पाण्याखाली आहेत.
एकीकडे आसासमध्ये पुराच्या पाण्यानं थैमान घातलं असतानाच दुसरीकडे बंगळुरुमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय. शहरातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पूरजन्य परस्थितीची पाहणी केली. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं शहरवासींयाचे हाल झाले आहेत.