बळीराजासाठी खुशखबर! दडी मारलेला पाऊस पुन्हा येणार

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय

Updated: Aug 14, 2021, 06:12 PM IST
बळीराजासाठी खुशखबर! दडी मारलेला पाऊस पुन्हा येणार title=

मुंबई: राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही कोरडा ठाक भाग असल्याने बळीराजावर तिबार पेरणीचं संकट आलं. इतकंच नाही तर तेही पिक करपून जातं का अशी धाकधूक लागली असताना आता बळीराजासाठी आनंदाची बातमी येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं आता पुन्हा राज्यात आगमन होणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये ऊन पावसाचा सध्या लपंडाव सुरू आहे. मात्र आता बळीराजासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पुन्हा 16 ऑगस्टपासून पाऊस सक्रिय होणार आहे. 

१६ ऑगस्टपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने दीर्घ ओढ दिली आहे. दोन आठवड्यांपासून अधिक काळापर्यंत पाऊस पडला नाही. खरिपाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दोन ते तीन दिवसांत या भागातही पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. 

अनेक भागांतील शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. नाहीतर पुन्हा पाण्याविना शेती करपण्याचं मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवण्याची चिन्हं आहेत.