आईने मंगळसूत्र गहाण ठेवलं, मुलींनी चीज केलं! तीन सख्ख्या बहिणी एकाचवेळ पोलीस दलात भरती

घरची आर्थिक स्थिती बेताची असताना मुलींनी आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. तीनही बहिणी एकाचवेळी पोलिस दलात भरती झाल्या आहेत.  

Updated: Jun 27, 2023, 08:18 PM IST
आईने मंगळसूत्र गहाण ठेवलं, मुलींनी चीज केलं! तीन सख्ख्या बहिणी एकाचवेळ पोलीस दलात भरती title=

Success Story : ऊसतोड कामगाराच्या मुलींनी आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात एकाच भरती झाल्या आहेत. आईने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून मुलींना शिकवले आहे. पोलिस दलात भरती झालेल्या बीडमधील या बहिणींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलींच्या यशामुळे आई वडिलांचा ऊर अभिमानाने भरुन आला आहे. 

परळी पासून जवळच असलेल्या सेलू तांडा येथील ऊसतोड कामगाराच्या मुलींचा महाराष्ट्रात डंका वाजत आहे. तीन सख्ख्या बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस म्हणून भरती झाल्या आहेत. त्यांच्या कर्तुत्वाने परळी तालुक्याची मान उंचावलीय. सध्या तिन्ही बहिंणींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बेताची आर्थित स्थिती असताना मुलींना शिकवले

परळी पासून जवळच असलेल्या सेलू तांडा येथील मारुती जाधव हे ऊसतोड कामगार म्हणून सुरुवातीला काम करीत होते. काही वर्षानंतर त्यांनी ऊसतोड मुकादम म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गावात त्यांना जमीन नाही, नाही संपत्ती. मारुती जाधव यांना पाच मुली आणि दोन मुले आहेत. कुटुंब मोठे असल्याने कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिक्षण दिले.

आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले

जाधव पती-पत्नीने सर्व मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा दिला. आई वडिलांच्या कष्टाचे त्यांच्या मुलींनीही चीज केले. मारुती जाधव यांची मोठी मुलगी सोनाली ही कोरोना काळात पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाली. तर दुसरी शक्ती आणि तिचे लहान बहीण लक्ष्मी या नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये त्यांची निवड झाली आहे. तिन्ही बहिणी गेल्या चार वर्षापासून पोलीस भरतीसाठी कसून सराव करीत होत्या. अभ्यास करीत होत्या. 

तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात दाखल झाल्याची पहिलीच घटना 

एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात  दाखल होणे ही परळीतील पहिलीच घटना आहे. सोनाली, शक्ती आणि लक्ष्मी या सख्ख्या बहिणींनी इतर मुलींना सुद्धा एक प्रेरणा देण्याचे काम केले आहे. सावित्रीच्या लेकी शिकल्या तर मोठ्या पदावर पोहोचू शकतात. हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या पोलीस दलातील निवडीचा सेलू तांडा येथील गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत करून आनंद साजरा केला आहे. मारुती जाधव यांच्या या तिन्ही सख्ख्या मुलींनी परळी तालुक्याची मान महाराष्ट्रात उंचावली आहे. दरम्यान इतर मुलींना व महिलांना प्रेरणादायी ठरणाऱ्या जाधव कुटुंबातील या तिन्ही संख्या बहिणींचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.