'जिंकलो तर मोदींमुळेच जिंकलो म्हणतील, अमित शाह क्रिकेटरच्या...'; संजय राऊतांची World Cup Final वरुन गुगली

World Cup 2023 Final IND vs AUS : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. आता हा खेळ राहिलेला नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 19, 2023, 12:32 PM IST
'जिंकलो तर मोदींमुळेच जिंकलो म्हणतील, अमित शाह क्रिकेटरच्या...'; संजय राऊतांची World Cup Final वरुन गुगली title=
(Photo Credit : Reuters)

World Cup 2023 Final IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) वर्ल्डकप 2023 चा (World Cup 2023) अंतिम सामना आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजता दोन्ही संघांमध्ये विजेतेपदासाठी जोरदार लढत सुरू होईल. 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील आजच्या दिवसाकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष होतं. तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकून विजेपदाचा दुष्काळ संपवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. तसेच स्टेडियमवर भारतीय चाहते देखील संघाचं मनोधैर्य वाढवणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा देखील सहभाग असणार आहे. पंतप्रधान मोदी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान आणि भाजपला लक्ष्य केलं आहे.

"या देशात काहीही होऊ शकते. कालपर्यंत हा खेळ होता. संपूर्ण देश त्यामध्ये सहभागी होता. आता भारतीय जनता पक्ष सहभागी झाला आहे. आता हा खेळ राहिलेला नाही. हा इव्हेंट झाला आहे. आपण जाऊन पहा. भाजपचे लोक संध्याकाळी सांगतील मोदी होते म्हणून आपण जिंकलो. मोदी होते म्हणून अशी बॉलिंग पडली,अशी गुगली पडली. मोदींनीच मंत्र दिला, अमित शहा क्रिकेटरच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते. खेळालाही सोडायला तयार नाही," असे संजय राऊत म्हणाले.

"इव्हेंटपासून ज्यांना आनंद घ्यायचा त्यांनी घ्या. पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती. इकडचे उत्सव दिल्ली किंवा मुंबईत होत. कोलकाताच्या ईडन गार्डनवर होत असे. मुंबईतून संपूर्ण क्रिकेट हे अहमदाबादला हलवण्यात आले. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे. आज आपण जिंकण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहे. मोदी थे इसलिये हम जीत गये मोदी है तो वर्ल्ड कप की जीत मुनकीम है असे होणार पाहत रहा," असेही संजय राऊत म्हणाले.