INDIA alliance Mumbai meeting : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकसभेच्या 450 जागांचं वाटप करण्याचा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. 2019 चे निवडणूक निकाल हा निकष ठरवून हा रनर अप फॉर्म्युला समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या फॉर्म्युल्यानुसार 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर तेच राजकीय पक्ष पुन्हा निवडणूक लढतील. म्हणजे ज्या पक्षाचा खासदार, ती जागा त्या पक्षाला मिळेल. तर, ज्या जागांवर गेल्यावेळी ज्या राजकीय पक्षाला दुस-या क्रमांकाची मतं मिळाली असतील, ती जागाही तोच पक्ष लढवेल. या रनर अप फॉर्म्युल्यावर इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत विचारविनिमय होणार आहे. त्यानंतर या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होईल, असं सूत्रांनी सांगितले. हा रनरअप फॉर्म्युला लागू केला, तर कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळू शकतात हे देखील विचारात घेण्यात आलयं.
2019 मध्ये काँग्रेसचे 422 उमेदवार रिंगणात होते. 19.7 टक्के मतांसह काँग्रेसचे 52 खासदार विजयी झाले. 209 जागांवर काँग्रेस उमेदवारांना दुस-या क्रमांकाची मतं मिळाली. रनर अप फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसच्या वाट्याला 261 जागा मिळतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 41 जागा मिळतील. उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीला 36 जागा मिळतील. मात्र, हा फॉर्म्युला काही राज्यांमध्ये धक्कादायक ठरणार आहे. कारण बिहारमध्ये 16 खासदार असलेल्या नीतीश कुमारांच्या जेडीयूला 17 जागाच लढवता येतील. तर एकही खासदार नसलेल्या लालू यादवांच्या आरजेडीला 19 जागांवर उमेदवार उभे करता येतील
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, तर 3 जागी शिवसेना उमेदवार दुस-या स्थानी होते. राष्ट्रवादीचे 4 खासदार विजयी झाले, तर 15 जागी राष्ट्रवादी उमेदवार दुस-या जागी होते. याचाच अर्थ शिवसेनेच्या वाट्याला 21, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 19 जागा येतील. सध्या राज्यात केवळ एकच खासदार असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ 8 जागा येतील
हा रनर अप फॉर्म्युला अनेक राजकीय पक्षांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष तसंच पीडीपीसारख्या काही राजकीय पक्षांना त्याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यासारख्या बड्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला फारच कमी जागा येतील. त्यामुळं जागावाटपाचा हा फॉर्म्युला सगळ्यांनाच मान्य होईल का? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.