विधानसभा अध्यक्षपदाचा मार्ग खुला? आता प्रतीक्षा राज्यपालांच्या निर्णयाची...

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या मतदानाच्या पध्दतीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने काँग्रेस नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Updated: Mar 9, 2022, 05:04 PM IST
विधानसभा अध्यक्षपदाचा मार्ग खुला? आता प्रतीक्षा राज्यपालांच्या निर्णयाची...  title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यासाठी नियमात बदल केला. सरकारच्या या निर्णयाला भाजप नेते गिरीश महाजन, जनक व्यास यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

भाजप नेत्यांची ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. राज्यपालांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करावाच लागणार आहे. तसेच, निवडणुकीसाठी पक्षाची तयारी केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारने आवाजीऐवजी गुप्त पध्दतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयाला आक्षेप घेतला. तर, भाजप आमदार गिरीष महाजन आणि जनक व्यास यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

दोन्ही बाजूने या अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीही, निवडणूक घेण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी तीन वेळा राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सरकारच्या त्या पत्राला उत्तर दिले. त्यामुळे या अधिवेशनात ही निवडणूक की नाही याकडे लक्ष लागले होते. 

याच दरम्यान, भाजप नेत्यांची याचिका फेटाळल्याने निवडणूक प्रक्रियेतील अडथळे दूर झाल्याचा आनंद सरकारच्या गोटात पसरला आहे. ९ तारीख उलटून गेली असली तरी २५ मार्चपर्यंत अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.