नाशिक : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि मालेगावमधली कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे दोघं तिकडे गेले होते.
नाशिक आणि मालेगावचा दौरा करून जळगावच्या दिशेने जात असताना प्रविण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. प्रविण दरेकर आणि इतर सगळे जण सुरक्षित आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला.
स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत.
काळजी करण्यासारखे काहीही नाही.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2020
जळगावला जात असताना नशिराबाद जवळ हा अपघात झाला. गाडीमध्ये असलेल्या प्रविण दरेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पाऊस आणि अंधार यामुळे ताफ्यातील मागच्या गाडीचा धक्का लागल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान मालेगावमध्ये असताना फडणवीस यांनी वीज बीलं कमी झाली पाहिजेत, अशी मागणी केली. वीज बिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या संकटकाळात सत्ताधारी पक्षांनी आपसात भांडण्याऐवजी कोरोनाशी भांडायला हवे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.