जळगांव : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठणार आहे.. आज राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं दिलीये. त्यामुळे किमान तापमान आणखी खाली कोसळण्याची शक्यता आहे..
खान्देशात वाढत्या थंडीचा दुष्परिणाम केळी आणि पपई पिकावर होत असल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या लाटेमुळे पपई आणि केळी पीक खराब होण्याची भीती आहे.
धुळे, नंदूरबार जिल्ह्यात तापमानाचा पार सातत्याने 5 अंशांच्या खाली आहे. अशा स्थितीत पीक कसं वाचवावं असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. अनेक शेतक-यांनी फळं झाडावरच प्लॅस्टीकच्या आच्छादनाने झाकून ठेवली आहेत.
उत्तर महाराष्ट्रात शीतलहरींचा प्रकोप पहायला मिळतोय. धुळे जिल्ह्यात आज निच्चांकी तापमानाची नोंद झालीय. जिल्ह्याच्या इतिहासात एवढे कमी तापमान नोंदवले गेलंय.
आज धुळ्यात तापमानाचा पारा 2.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानाचा पारा चार अंशापर्यंत खाली आहे. या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय.
निफाडचा पारा पुन्हा घसरलाय.. निफाडमध्ये 4.6 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झालीये. कडाक्याच्या थंडीमुळे या भागातील द्राक्षबागांना मोठा फटका बसतोय.. तसंच जनजीवनावरही थंडीचा परिणाम होत आहे..