कधीही निवडणूक न पाहिलेलं ७८ जणांचं गाव

कोकणातलं एक छोटंसं गाव...गाव केवढं छोटं तर ७८ जणांचं...एक छोटंसं बेटंच म्हणा ना... या गावानं कधी निवडणूकच पाहिली नाही हे आणखी एक इथलं वैशिष्ट्य... 

Updated: Dec 8, 2017, 10:19 PM IST
कधीही निवडणूक न पाहिलेलं ७८ जणांचं गाव title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोकणातलं एक छोटंसं गाव...गाव केवढं छोटं तर ७८ जणांचं...एक छोटंसं बेटंच म्हणा ना... या गावानं कधी निवडणूकच पाहिली नाही हे आणखी एक इथलं वैशिष्ट्य... 

१०९ घरांचं गाव

जुवे-जैतापूर...रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातलं गाव...गावचं क्षेत्र अवघं ४५ हेक्टर एवढं असून गावात १०९ घरं आहेत...पण बहुतांश घरं बंद असतात...राज्यातली सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून या गावाची ओळख..या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली निवडणूक दरवेळी बिनविरोध होते...यंदाही ही परंपरा कायम ठेवली जाणार आहे.

शाळेत २ विद्यार्थी १ शिक्षक 

विशेष म्हणजे गावच्या चारही बाजूंना खाडी असली तरी विहिरींचं पाणी मात्र गोड आहे... उपजीविकेचं साधन म्हणून ग्रामस्थ मासेमारी करतात... गावातल्या शाळेत केवळ २ विद्यार्थी असून १ शिक्षक आहे... गावात दळणवळणाचं साधन म्हणून होडीशिवाय पर्याय नसल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात...रस्ता बांधणीची गेल्या काही वर्षांपासून मागणी जोर धरू लागलीय. 

गावाला ऐतिहासिक महत्त्व

खाडीच्या पाण्यानं वेढलेल्या जुवे-जैतापूर गावाला ऐतिहासिक महत्त्वही आहे... संभाजी राजांना ज्यावेळी संगमेश्वरजवळ अटक करण्यात आली. त्यावेळी अटकेची चाहूल चांगल्यानं संभाजीराजांनी ताराराणीला राजापूर खाडीमार्गे सिंधुदुर्गात नेण्यास सांगितलं... त्यावेळी सुरक्षित बेट म्हणून ताराराणींना जुवे-जैतापूर इथं ठेवण्यात आल्याचं ग्रामस्थ सांगतात...व्यवसायाची कुठलंही साधन नसल्यानं इथली अनेक लोकं मुंबईत असतात... पण आजही या लोकांची गावाशी नाळ कायम आहे... प्रत्येक सणाला चाकरमानी गावात येतोच. 

पर्यटन स्थळ म्हणून उद्यास येऊ शकतं 

रस्ता झाल्यास हे गाव देखील पर्यटन स्थळ म्हणून उद्यास येऊ शकतं आणि पर्यायानं रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील...मात्र त्यासाठी गरज आहे ती गावाच्या विकासाकडे लक्ष देण्याची.