मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : कळंब नगरपालिकेतील काही अधिकारी आणि संबंधीत मंडळींनी पदाचा गैरवापर केल्याचं उघड झालं आहे. या मंडळींनी पदाचा गैरवापर करून न केलेल्या कामाचे पैसे उचलून परस्पर लाटले आहेत. कळंब नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 8 मधील नालीचे काम 2012 साली झाला होता. मात्र नगरपालिकेतील या मंडळींनी 2019 सालच्या जानेवारी महिन्यात वर्क ऑर्डर काढून, काम न करताच तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांचं बिल उचलून परस्पर लाटल्याचं उघड झालं आहे.
नगरपालिकेतील रेकॉर्डवर संबंधित काम हे जानेवारी महिन्यात पूर्ण झालं असून त्याचं बिल ही लेबर कॉन्ट्रॅक्टर मजूर सहकारी सोसायटीच्या नावाने उचललं आहे. मात्र आम्ही या वार्डातील नागरिकांना या नालीचे काम कधी झालं असल्याचं विचारलं असता त्यांनी हे काम सात ते आठ वर्षांपूर्वी झाल्याचं झी24 तासला सांगितलं.
एखादं काम नगरपालिकेच्या वतीने करताना मुख्यधिकारी, नगर अभियंता आणि नगराध्यक्ष, संबंधित विभागाचा कारकून यांच्याअंतर्गत होत असतो. मुख्यधिकारी यांची वर्क ऑर्डरवर सही असते, तर कामाच्या मंजुरीवर नगराध्यक्ष यांची सही असते. तर काम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र हे नगर अभियंता हे मुख्यधिकारी यांच्याकडे सादर करतो तेंव्हा जाऊन या कामाचं बिल निघत.
मग अशा स्वरूपाची प्रक्रिया असताना या मंडळींनी या सर्व बाबींकडे दुर्लक्षित का केलं? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय.याबाबत आम्ही मुख्यधिकारी यांना याबाबत विचारलं असता आपल्याला याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो असं, सांगितलंय.
अनेक वेळा नगरपालिकेच्या हिताचं सांगून पाहिजे तशी मनमानी सदरील मंडळी करत असतात. मात्र इथे नगरपालिकेच्या निधीचा अपहार झाला आहे. त्यामुळे तरतुदीनुसार असा प्रकार झाल्यास अधिकाराचा गैरवापर करणे, निधीचा अपहार करणे यांसारख्या आरोपाखाली 420, 409, 34 या कलमाखाली कारवाई करणे बंधनकारक आहे.
या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सरला सरवदे यांनी केली आहे.