Kalyan LokSabha : महायुतीकडून कल्याणचा सुभेदार कोण? श्रीकांत शिंदे हॅटट्रिक करणार?

Kalyan LokSabha constituency : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा कांटे की टक्कर पाहायला मिळणाराय... कल्याणची निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी कशी प्रतिष्ठेची बनलीय.

सौरभ तळेकर | Updated: Mar 13, 2024, 09:56 PM IST
Kalyan LokSabha : महायुतीकडून कल्याणचा सुभेदार कोण? श्रीकांत शिंदे हॅटट्रिक करणार? title=
Kalyan LokSabha constituency, Shrikant Shinde

Shrikant Shinde vs Aditya Thackeray : परंपरा... प्रतिष्ठा आणि अनुशासन....  कल्याणच्या सुभेदारीची यंदाची लढाई ऐतिहासिक ठरणार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना हॅटट्रिक करायचीय, दुसरीकडे भाजपही इथं दक्ष झालाय. तर शिवसेनेची शकलं पाडणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या किल्ल्यातच ठाकरेंनाही सुरुंग लावायचाय. असं कल्याण मतदारसंघाचा ट्रेलर आहे. राजकीयदृष्ट्या हेवीवेट मतदारसंघात जनतेचं मात्र म्हणावं तसं 'कल्याण' झालंच नाही. 

कल्याणचं कधी होणार 'कल्याण' ?

रेल्वेचं जंक्शन म्हणून मिरवणाऱ्या कल्याणमध्ये रेल्वे गाड्यांची अपुरी संख्या ही मोठी समस्या आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवा, ही कल्याणकरांची प्रमुख मागणी आहे. कल्याणमधला बराचसा भाग अजूनही तहानलेलाच आहे. रखडलेल्या रस्त्यांच्या कामामुळे शिळफाट्यावरची वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी आहे. त्याशिवाय घनकचरा ही सुद्धा कल्याणमधली मोठी समस्या आहे. 

कल्याण हा पहिल्यापासून शिवसेनेचा किल्ला राहिलाय. प्रकाश परांजपेंनी इथे मोठी आणि यशस्वी इनिंग खेळली. त्यामुळेच या भागात शिवसेना रुजली आणि वाढली देखील... मात्र, आता कल्याणचं राजकीय गणित कसं असेल? असा सवाल विचारला जातोय.

कल्याणचं राजकीय गणित

2009 मध्ये शिवसेनेकडून आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंचा जवळपास 24 हजार मतांनी पराभव केला. 2014मध्ये आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. श्रीकांत शिंदेंनी आनंद परांजपेंचा जवळपास 3 लाख 18 हजार मतांनी पराभव केला. 2019 मध्ये श्रीकांत शिंदे पुन्हा निवडून आले त्यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील 3 लाख 44 हजार मतांनी पराभूत झाले. कल्याण मतदारसंघात डोंबिवली, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या तीन मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. तर अंबरनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, मुंब्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचा आमदार आहे. 

आदित्य ठाकरे लावणार सुरंग?

श्रीकांत शिंदे सलग दोन वेळा कल्याणमधून खासदार झालेत. मात्र शिवसेना फुटल्यानंतर ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची झालीय. त्यातच श्रीकांत शिंदेंविरोधात भाजपमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरतील, अशी जोरदार चर्चा आहे. तर ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचेही कल्याणमध्ये दौरे वाढलेत. त्यामुळे अंधारेंचं नावही चर्चेत आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात आदित्य ठाकरे कल्याणच्या मैदानात उतरलेच तर महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी युद्धभूमी असेल. खासदारकीची निवडणूक असली तरी ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच ही लढाई असणार आहे.

पुत्रप्रेम आणि प्रतिष्ठा असा हा कल्याणचा रणसंग्राम असेल. श्रीकांत शिंदेंसाठी मुख्यमंत्री स्वतः जोरदार फिल्डिंग लावतीलच, तर ठाकरेंचा उमेदवार समोरच्याला पाडायचंच, या इराद्यानं मतदारसंघात लढेल. भाजप एकदिलानं, एकमतानं पाठिंबा देणार की स्वतःच मतदारसंघावर दावा ठोकणार, याचे पत्ते अजूनही खुले झालेले नाहीत. त्यामुळे एकमेकांचा कार्यक्रम करणारी ही निवडणूक असेल की खरंच मतदारसंघाचं कल्याण करणारी, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.