अलिबाग : Karnala Nagari Sahakari Bank Scam : कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीने अलिकडेच अटक केली आहे. कर्नाळा बॅकेच्या 529 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा (Karnala Nagari Sahakari Bank) परवाना आरबीआयकडून (RBI) रद्द करण्यात आला आहे. असे असले तरी गुंतवणूकदारांना 95 टक्के रक्कम परत मिळणार आहे, असे आश्वासन आरबीआयने दिले आहे. (Karnala Nagari Sahakari Bank license Canceled)
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 529 कोटींच्या घोटाळ्यामुळे अनेक बँकेचे खातेदार अडचणीत आले आहेत. त्यांचे पैसे बँकेत अडकले आहेत. तर काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घोटाळ्याला बँकेच्या संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. 50 हजार 689 ठेवीदारांच्या 529 कोटीच्या ठेवी बँकेत होत्या, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी त्याच्यावर तसेच 17 संचालकांवर एफआयआर दाखल झाला होता. तरी देखील त्यांना अटक करण्यात आले नव्हते. याबाबत भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी ईडीकडे लेखी तक्रार केली होती.
तर दुरीकडे बँकेत पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांचे आशा पल्लवित झाल्या आहेत. आरबीआयने गुंतवणूकदारांना 95 टक्के रक्कम परत मिळणार आहे, असे आश्वासन दिले आहे. त्याआधी आपले पैसे परत मिळतील, अशी आशा त्यांना वाटत होती. पैसे घेण्यासाठी ठेवीदारांना बँकेने अनेकदा तारखा दिल्या पण कोणत्याच ठेवीदाराला पैसे मिळाले नाही, हाती फक्त टोकन आले. आता आरबीआयच्या आश्वासनानंतर ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रायगड येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 529 कोटीच्या घोटाळा झाल्याने ठेवीदार चिंतेत होते. बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील 17 सहकारी जबाबदार आहेत. तसेच बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते, असा थेट आरोप भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केला आहे. या घोटाळ्यात अनेक सहभागी आहेत. त्यांना देखील अटक करून त्याच्या संपत्ती जप्त करा आणि ठेवीदारांचे पैसे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळावा, बँक अडचणीत आणणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी भाजपच्या आमदारांनी विधिमंडळच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते.