Karnataka Election: 'मराठी उमेदवारालाच निवडून आणा' म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी 'ते' 'ट्वीट डिलीट केलं, नेमकं झालं तरी काय?

Karnataka Election: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी ट्वीट करत मराठी उमेदवारालाच निवडून आणा असं आवाहन केलं होतं. पण महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) केलेल्या टीकेनंतर राज ठाकरे यांनी ट्विट (Tweet) डिलीट करत नव्याने ट्वीट केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 8, 2023, 06:01 PM IST
Karnataka Election: 'मराठी उमेदवारालाच निवडून आणा' म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी 'ते' 'ट्वीट डिलीट केलं, नेमकं झालं तरी काय? title=

Karnataka Election: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी ट्वीट (Tweet) करत बेळगावमधील सीमाभागातील नागरिकांना मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे असं आवाहन केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्यावर हे ट्वीट डिलीट करण्याची वेळ आली आहे. राज ठाकरेंनी हे ट्वीट डिलीट केलं असून, काही बदल करत नव्याने ट्वीट केलं आहे. पण नेमकं असं झालं तरी काय? जाणून घ्या. 

राज ठाकरे काय म्हणाले होते?

"सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. 

महाराष्ट्र एकीकरण समितीची टीका 

राज ठाकरेंच्या आवाहनानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षाच्या मराठी उमेदवारालाच मत द्या, असं म्हटल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली. तुमचे ते बालिश उपदेश तुमच्यापाशीच ठेवा असं महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनं राज ठाकरेंना सुनावलं आहे. 

राज ठाकरेंनी नव्याने केलं ट्वीट 

महाराष्ट्र एकीककरण समितीने टीका केल्यानंतर राज ठाकरेंनी ट्वीट डिलीट करत नव्याने ट्वीट केलं. मराठी उमेदवारालाच मतदान करा ऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करा, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे.

नव्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी काय लिहिलं आहे?

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. 

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे.  सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. 
  
मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. 

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.