आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण: राज्यात शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली होती. यानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने शिवसेनेला धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलल्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोघांकडूनही सभापतीपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
येत्या ३ जानेवारीला होणार्या निवडणुकीत युतीचे भवितव्य ठरणार आहे. शिवसेनेकडून गणेश कोट तर भाजपकडून विकास म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत सेनेचा एक गट नाराज असल्याने सेनेची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेने राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात पकडत भाजपला धक्का दिला होता. मात्र, आतापर्यंत केडीएमसीत युती अभेद होती. याठिकाणी महापौर शिवसेनेचा आहे तर उपमहापौर पद भाजपकडे आहे. मात्र, ३ जानेवारीला होऊ घातलेल्या केडीएमसी स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळी ही युती संपुष्टात येऊ शकते.
सुरुवातीला बोलले जात होते की, शिवसेनेचे गणेश कोट हे बिनविरोध निवडून येतील. मात्र, फॉर्म भरण्याची मुदत संपायला २० मिनिटे बाकी असताना भाजपचे गटनेते विकास म्हात्रे यांनी सभापती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.
भाजप उमेदवार विकास म्हात्रे यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, महापौर पदासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली. त्यावेळी स्थायी समितीचे सभापतीपद भाजपला देण्यात येईल, असा करार झाला होता. मात्र, शिवसेनेने हा करार पाळला नाही. परिणामी आम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे विकास म्हात्रे यांनी सांगितले. तर शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला देत आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता, असे स्पष्ट केले.
केडीएमसीचे स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या ८, भाजपच्या ६ आणि मनसे व काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. परंतु, सध्या शिवसेनेचा एक सदस्य नाराज असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. अशा परिस्थितीत काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यास मनसेची भूमिका निर्णायक राहील.