अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथं नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. जिल्हा व सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय.
सबळ पुराव्याअभावी मुख्य आरोपी सचिन गोलेकरसह ९ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. २९ एप्रील २०१४ रोजी प्रेमप्रकरणातून नितीन अगे या १७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. खर्डा येथील इंग्लीश स्कूलमध्ये नितीन आगेचे त्याच्याच शाळेतल्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. हे प्रेमप्रकरण मान्य नसल्यामुळे नितीनची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता.
प्रेमप्रकरणातून नितीन आगे याला आरोपींनी शाळेतून मारहाण करत आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन तेथे अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर डोंगरातील झाडाला त्याला गळफास देण्यात आले असल्याची तक्रार देण्यात आली होती. नितीन आगे हत्या प्रकरणात गावातील सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले, निलेश गोलेकर, विनोद अभिन्यू गटकळ, भूजंग सुर्यभान गोलेकरसह १३ जणांविरुद्ध हत्या करणे, तसेच अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते.