मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. पण, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळालं नाही. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, रागयड, पुणे या भागांना पुराचा फटका बसला आहे.
कोल्हापूरात पंचगंगा नदी ५० फुटांच्या वर वाहत असल्यामुळे या नदीचं पाणी विविध भागांमध्ये शिरलं आहे. परिणामी, ठिकठिकाणी पुराचं पाणी आहे. पुणे- बंगळुरू महामार्गावरही पुराचं पाणी आल्यामुळे कोल्हापुरातील एकंदर पूरपरिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येत आहे. साधारण आठवडाभरापासून सुरु असणारा पाऊस आणि पूर पाहता कोल्हापुरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुराच्या पाण्यामुळे कोल्हापुरातील एकूण १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर, जिल्हाधिकारी कार्यालय पिरसरातही पाणी शिरलं आहे. राधानगरी धरणाचे एकूण सात स्वयंचलीत दरवाजे खोलण्यात आले आहेत. तर, उर्वरित दोन दरवाजांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत या प्रसंगी एनडीआरएफची दोन पथकं कोल्हापुरात दाखल झाली आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास २००५ च्या पूरपरिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
कोल्हापुराप्रमाणेच साताऱ्यातही कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ही नदी सध्याच्या घडीला ४५ फुटांवर वाहत आहे. तर, कोयना धरणातूनही नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे. ज्यामुळे, कोयना आणि कृष्णा या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.
सांगलीतील शिरगावला पुराच्या पाण्याने गावाला वेढा घातला असल्यामुळे त्याला बेटाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. पुण्यातही खडकवासला धरणातून ४५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे काही भागांमध्ये पुकाचं पाणी शिरलं आहे. नाशिकमध्येही गोदावरीच्या पाण्याची पातळी पाहता पूरपरिस्थिती कायम आहे. तर, इथे रागयडमध्ये सावित्री आणि गांधारी या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. या ठिकाणी पावसाचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं तरीही संततधार सुरुच आहे. त्यामुळे धोका पूर्णपणे ओसरला असं मात्र म्हटलं जात नाही आहे.