"आमदारांची पोरं आमदार होणार हा निसर्गाचा नियम"; मुलाच्या सत्कार सोहळ्यात भाजप नेत्याचे वक्तव्य

मराठवाडयातील नेते खेकड्यासारखं खाली ओढतात, असेही भाजप नेत्याने म्हटले आहे

Updated: Oct 31, 2022, 01:30 PM IST
"आमदारांची पोरं आमदार होणार हा निसर्गाचा नियम"; मुलाच्या सत्कार सोहळ्यात भाजप नेत्याचे वक्तव्य title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सातत्याने विरोधकांवर घराणेशाहीवरुन (dynasticism) निशाणा साधत असतात. देशातील भ्रष्टाचार (Corruption) आणि घराणेशाहीवर प्रहार करत त्यांना समूळ नष्ट करावे लागेल असे मत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन व्यक्त केले होते. राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला (dynasticism) पोषण दिले जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मात्र आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून घराणेशाहीची उदाहरणे दिली जात आहेत. आमदारांची (MLA) पोरं आमदार होणार हा निसर्गाचा नियम आहे असे विधान भाजप (BJP) नेत्याने केले आहे.

भाजपचे (BJP) माजी मंत्री आणि जालन्यातील (jalna) परतुरचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी हे विधान केले आहे. लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर (rahul lonikar) यांची भाजपच्या (BJP) युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जालन्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) बोलत होते.

"आमदारांची पोरं आमदार,खासदारांची पोरं खासदार, डॉक्टरांची मुलं डॉक्टर,वकिलांची पोरं वकील आणि पुढाऱ्यांची पोरं पुढारी हा निसर्गाचा नियम आहे. माझी इच्छा नसताना राहुल लोणीकर राजकारणात आला आणि त्याने चांगले नाम कमावले. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. मी खूप मोठा संघर्ष केला. संघर्षामुळे मला मंत्री होता आलं. जिल्ह्यात तीन मंत्री असताना अडचणी यायच्या. माझ्या विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे झाली," असे बबनराव लोणीकर म्हणाले.

राहुल लोणीकर यांच्या सत्कार सोहळ्याला भाजपातील (BJP) पहिल्या फळीतील नेते उपस्थित नसल्याचं पाहून लोणीकर यांनी स्वपक्षीय नेत्यांवर देखील टीकास्त्र सोडलं. मराठवाडयातील नेते हे खेकड्यासारखं खाली ओढतात. राहुलला आशीर्वाद देण्यासाठी पहिल्या फळीतील कुणी आलं नसलं तरी दुसऱ्या फळीतील सर्व नेते हजर असल्याचा आनंद झाला असं लोणीकर म्हणाले. जे लोक रस्त्यात जास्त खड्डे खोदतील,त्या खड्ड्यातून तुला पुढं जायचं आहे असे म्हणत लोणीकर यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाव न घेता शरसंधान साधलं.