नागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं

नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 27, 2017, 05:07 PM IST
नागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय. याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येत असून अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. 

डोक्यावर हमखास हेल्मेट दिसतं

नागपूरमध्ये सध्या रस्त्यावर दुचाकीस्वारांच्या डोक्यावर हमखास हेल्मेट दिसतं. वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती केल्यापासून हा फरक रस्त्यांवर लगेच दिसायला लागलाय. 

90 टक्के दुचाकीस्वारांचे हेल्मेट

शहरातील सुमारे 90 टक्के दुचाकीस्वार हेल्मेट घालूनच घराबाहेर पडतात. सुरूवातीला हेल्मेटसक्तीला विरोध झाला पण आता हेल्मेट नागरिकांनी आपलंस केलं. याचा सकारात्मक परिणाम आकडेवारीतूनही दिसायला लागला. 

560 अपघातात 184 जणांचा मृत्यू

शासकीय रूग्णालयाच्या दंतविभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी 45 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर यावर्षी केवळ 25 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 2016मध्ये 658 रस्ते अपघातात 234 मृत्यू झाले. तर यावर्षी ऑक्टोबरपर्यंत 560 अपघातात 184 जणांचा मृत्यू झाला. 

दुचाकीस्वार हेल्मेट घालत असतानाच चारचाकी चालकही सीटबेल्टचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. 

48 हजार जणांवर कारवाई 

गेल्यावर्षी सीटबेल्ट न लावता गाडी चालवणाऱ्या 48 हजार जणांवर कारवाई झाली. तर यावर्षी हे प्रमाण केवळ 8 हजारांवर आलंय. दारू पिऊन वाहन चालवण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात घट झालीय. 

वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा

वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, या विषयावर नागपुरात या वर्षभरात अनेक संस्थांनी काम केलं. प्रकर्षाने नागपूरमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरला.

वाहतूक विभागाने राबवलेल्या योजना

पोलिसांची दंडात्मक कारवाई, वाहतूक विभागाने राबवलेल्या योजना, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली जनजागृती आणि त्याला नागरिकांनीही दिलेली साथ याचा हा एकत्रित सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय. 

नागपूरकरांनी नियमांचं पालन केलं

नागपूरकरांनी नियमांचं पालन केलं आहे. सध्या प्रामुख्याने पोलिसांच्या भीतीपोटी हे नियम पाळले जात असले तरी नियम पाळण्याची ही सवय व्हायला हवी... नागपूरकरांनी करून दाखवलं. राज्यातल्या इतर शहरातले नागरिक हे कधी करणार ?