Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राबरोबरच देशभरातील राजकीय, समाजिक आणि दैनंदिन घडामोडींसंदर्भातील क्षणोक्षणाच्या लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

23 Aug 2024, 09:36 वाजता

राज्यसभा बिनविरोध; दोन्ही महायुतीचेच उमेदवार 

राज्यसभेच्या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या वाट्याला आल्या आहेत. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उमेदवार न दिल्याने बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत दोन अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र अर्ज पडताळणीमध्ये अपक्षांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांची निवड झाल्याने आता राज्यसभेत अजित पवार यांच्या खासदारांची संख्या 3 वर गेली आहे.

 

23 Aug 2024, 09:34 वाजता

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीसाठी 400 निरीक्षक

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीसाठी 400 निरीक्षक तैनात करण्यात येणार. केंद्रीय निवडणूक आयोगाने  जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या 400 हून अधिक निरीक्षकांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान बनावट प्रक्रियेपासून सावध राहण्यास सांगितले. आयोगाने निरीक्षकांना सल्ला दिला आहे की, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या अशा विधानांना त्वरित प्रतिसाद द्यावा. 

23 Aug 2024, 09:33 वाजता

विनेश फोगटची सुरक्षा काढल्याचा दावा

विनेश फोगट यांनी दिल्लीत महिला कुस्तीपटूंना मिळणारी सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट यांनी गुरुवारी गंभीर आरोप केला की दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना, त्यांच्यासह, मिळणारी सुरक्षा काढून घेतली आहे. या महिला कुस्तीपटूंनी माजी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दिल्लीत न्यायालयात साक्ष देणार आहे. विनेश फोगट आणि तिची चुलत बहीण संगीता फोगटयांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला आणि त्यानंतर माजी WFI प्रमुखाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाने मोठे लक्ष वेधले असून पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे आज होणार होणार आहे. विनेश फोगटच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी तातडीने प्रतिक्रिया दिली असून, उपायुक्त पोलिसांनी "कुस्तीपटूंना दिलेली सुरक्षा काढून घेतलेली नाही," असं सांगितलं आहे. 

23 Aug 2024, 08:39 वाजता

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून अमेरिका दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.  यादरम्यान ते अमेरिकेचे संरक्षण सचिव ऑस्टिन लॉयड यांची भेट घेणार आहेत. संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा होईल. याशिवाय संरक्षण मंत्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक सहाय्यक जेक सुलविन यांची भेट घेणार आहेत.

23 Aug 2024, 08:01 वाजता

नाशिकमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक

सकाळी 10 वाजता महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व तसेच अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

23 Aug 2024, 07:58 वाजता

शिंदे-फडणवीस-पवार आज नाशिकमध्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमधील कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. महिला सशक्तीकरण अभियानाला कार्यक्रमाला हे नेते उपस्थित असणार असून हा कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता होणार आहे.

23 Aug 2024, 07:56 वाजता

शनिवार-रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

येत्या शनिवार रविवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. ठाणे व रायगडला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या सोमवारी 26 ऑगस्टला गोकुळअष्टमी आहे तर मंगळवारी दहिकाला उत्सव साजरा केला जाणार आहे.

23 Aug 2024, 07:54 वाजता

दहावी-बारावी फेरपरीक्षेचा आज निकाल

दहावी, बारावी फेरपरीक्षेचा निकाल आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.inwww.mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसरया दिवसापासून गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल, त्यासोबतच शुल्कदेखील भरता येईल.

23 Aug 2024, 07:51 वाजता

‘मंकीपॉक्स’साठी सेव्हन हिल्स रूग्णालयात स्वतंत्र कक्ष आरक्षित

मुंबईमध्ये अद्याप ‘मंकीपॉक्स’चा एकही रूग्ण आढळलेला नाही. मात्र विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता सावधगिरी म्हणून मुंबई महानगरपालिकेने सेव्हन हिल्स रूग्णालयात 14 खाटा असलेला कक्ष आरक्षित ठेवला आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

23 Aug 2024, 07:49 वाजता

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी 43 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात 43 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा नीट परीक्षेत राज्यातून तब्बल 1 लाख 40 हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रवेशाच्या नोंदणीसाठी शुक्रवारी अंतिम दिवस आहे. यंदा नीट परीक्षेत तब्बल 1 लाख 40 हजार विद्यार्थी राज्यातून पात्र ठरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या 10 ते 11 हजाराने अधिक आहे.