Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर. 

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन असणार आहे. आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी असणार आहे. सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण असणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल. 

7 Dec 2024, 21:37 वाजता

उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

पाण्यातून अथवा अन्नातून विष बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय . मात्र यात सपना मिरकुटे या २ वर्षाच्या मुलीची दुर्दैवी मृत्यू झाला.तर घरातील ५ जणांना हाच त्रास झाल्याने त्यांना बदलापूर पालिकेच्या आशा सेविका आणि समाजसेवकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.ही माहिती पालिकेला मिळाल्यानंतर त्यांनी आदिवासी वाडीत मेडिकल कॅम्प घेत गावकऱ्यांची तपासणी केली.मीरकुटे कुटूंब त्रास होणाऱ्यांना करणी झाली असा संशय व्यक्त करीत असल्याने रुग्णालयात दाखल करत नव्हते, मात्र आशा सेविका आणि किशोर मेहेर यांनी त्यांना समजावल्याने ते रुग्णालयात दाखल करायला तयार झाले.

7 Dec 2024, 20:44 वाजता

मुंबई विद्यापीठाकडून पेट परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण 5040 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यापैकी एकूण 3794 एवढे विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते. यापैकी या परीक्षेत एकूण  २००८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ( उत्तीर्णतेचे प्रमाण 53 % आहे )परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्याना त्यांच्या ईमेल लॉगिन मध्ये या परीक्षेचे प्रमाण पत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. विद्यार्थ्याना मिळणारे प्रमाणपत्र हे विशेष फीचर क्यूआर कोडयुक्त असून ऑनलाइन पडताळणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. दिनांक 17 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी विविध केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

7 Dec 2024, 19:31 वाजता

अबू आझमी महाविकास आघाडीला धक्का देणार?

विशेष अधिवेशनात मविआमध्ये ताळमेळ नसल्याचं उघड झाले आहे. मविआच्या नेत्यांनी शपथविधीवर बहिष्कार घातला असताना विनोद निकोले, अबू आझमी, रईस शेख यांनी शपथ घेतली.मविआच्या कार्यपद्धतीवर अबू आझमींनी टीका केली.  समाजवादी पार्टी मविआतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

7 Dec 2024, 19:26 वाजता

रायगडच्या कुंडलिका नदी पात्रात चारजण बुडाले

रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली आहे.कुंडलिका नदी पात्रात चार जण बुडाले आहेत. बचाव पथक, पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश आले आहे. बुडालेल्यांमध्ये तीन महिला एका लहान मुलाचा समावेश आहे. सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते.नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली.लहान मुलगा पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन महिलाही बुडाल्या.

7 Dec 2024, 18:49 वाजता

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट 

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. 4 महिलांसह 11 जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला आहे. तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोर पसार झालेत.तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास केला.

7 Dec 2024, 18:04 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमीचा मेसेज 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला हा मॅसेज आहे. मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज पाठवला आहे. बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचंही मेसेजमध्ये म्हटलंय. तसेच दोन व्यक्तींची नाव लिहून ते दोघं ISI एजंट असल्याचं म्हटलंय. 

7 Dec 2024, 17:17 वाजता

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री होणार बैठक 

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ फॅार्म्युलावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळासोबतच विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती, उपसभापती या पदांबाबत चर्चा होणार. आज महायुतीचे तिन्ही प्रमुख नेत्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय होणार आहेत.

7 Dec 2024, 16:45 वाजता

'EVM विरोधात शरद पवार कायदेशीर लढा लढणार'

ईव्हीएमबाबत जनतेत प्रचंड असंतोष आहे त्यामुळे बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. ईव्हीएमविरोधात शरद पवार कायदेशीर लढा लढणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

7 Dec 2024, 16:15 वाजता

विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकर पुन्हा भरणार अर्ज

विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार आहेत. राहुल नार्वेकर उद्या अर्ज दाखल करणार आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांकडे सलग दुसऱ्यांदा जबाबदारी देण्यात आली आहे.

7 Dec 2024, 15:17 वाजता

शपथविधीवर बहिष्कार म्हणजे लोकांच्या मतदानाचा अवमान- राहुल नार्वेकर 

शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा इतिहासात प्रथमच घडत आहे. लोकांच्या मतदानाचा हा अवमान आहे. संसदीय लोकशाहीला अशोभनीय काम असल्याची प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.