close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यातील हेल्मेट सक्ती शिथील करण्याचे गिरीष बापटांचे संकेत

महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज पुण्यासाठी चा आपला जाहीरनामा

Updated: Apr 18, 2019, 03:34 PM IST
पुण्यातील हेल्मेट सक्ती शिथील करण्याचे गिरीष बापटांचे संकेत

पुणे :  हेल्मेट सक्ती हा सरकारचा निर्णय नसून हा न्यायालयाने दिलेला आदेश आहे. मात्र तरीही राज्य आणि राष्ट्रीय मार्गावर ही सक्ती कायम ठेऊन शहरातील अंतर्गत भागा साठी कायदा लवचीक करता येईल का ? असा प्रयत्न सुरु असल्याचे सांगत गिरीष बापट यांनी हेल्मेट सक्ती शिथील होण्याचे संकेत दिले आहेत. महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज पुण्यासाठी चा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी ते बोलत होते.   

पुण्यासाठी रेल्वेचा स्वतंत्र विभाग, शहरातील मेट्रो प्रकल्प,  लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, २४ बाय ७ आणि समान पाणीपुरवठा प्रकल्प,  कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना, स्वच्छ भारत मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी यासारखी अनेक भरगच्च आश्वासन देणारा पुण्याचा  जाहीरनामा महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी नुकताच
प्रसिध्द  केला. पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना ३८२ कोटीचे प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यातील १२ प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच पुणे मेट्रो प्रकल्प पूर्ण करून शहरभर जाळे निर्माण करणार असल्याचेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.

भाजप जाहीरनाम्यातील प्रमुख संकल्प

* विमानतळ विकास,पुरंदर येथील विमानतळ पूर्ण करून लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरणं करणार
* पुण्यासाठी रेल्वेचा स्वतंत्र विभाग सुरू करणार
* वाहतुकीसाठी पुण्याबाहेरील १२८ किलोमीटर लांबीच्या पुणे शहरातील उपनगराना जोडणाऱ्या ३६ किलोमीटर रिंगरोडची कामे पूर्ण करणार..
* २४ बाय ७ आणि समान पाणीपुरवठा प्रकल्प नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करणार...
* मुळा मुठा नदी शुद्धीकरण योजनेअंतर्गत ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणार
*वैद्यकीय सुविधांसाठी प्रयत्न करणार
* स्वच्छ भारत योजनेची जनजागृती करून प्रभावी अंमलबजावणी करणार
* शिक्षणासाठी अनुदानित शाळा व महाविद्यालयाचे नियमितपणे मूल्यांकन करून आवश्यक सोयीसुविधा पुरविणार...
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणारे खेळाडू  घडविण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणार
* सर्वांसाठी घरे ही केंद्राची योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणार.
* वारसा जतन आणि संस्कृती यामाध्यमातून शिवसृष्टी साकारणार,गदिमा स्मारक उभारणार,सांस्कृतिक विद्यापीठ यासह अनेक केंद्रे शहरात उभारणार आहेत.