LokSabha 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांवरुन तिढा सुरु आहे. आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. दरम्यान महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसंच वंचित मविआमध्ये सहभागी झाला तरी शरद पवार गट 9 जागा लढवण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सातारा, माढा, बारामती, बीड, वर्धा, शिरूर, रावेर, दिंडोरी, भिवंडी हे 9 मतदारसंघ मिळू शकतात. या 9 मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच त्यांनी निवडणूक लढावी असा आग्रहदेखील होत आहे. पुणे, सातारा किंवा माढा मतदार संघातून ते उतरावेत अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. पण शरद पवारांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण माढातून निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही असं शऱद पवार म्हणाले आहेत.
मला कार्यकर्ते पुणे, सातारा किंवा माढामधून निवडणूक लढण्यास सांगत होते अशी माहिती शरद पवारांनी दिली होती. यानंतर आज शरद पवारांनीच आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. तुम्ही निवडणूक लढणार का? असं विचारलं असता त्यांनी आपण कोणतीच निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं. "राजकीय आयुष्यात मी 14 निवडणुका लढलो आहे. या सर्व निवडणुका मी जिंकलो आहे. आता आणखी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही," असं ते म्हणाले.
माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. तसंच ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. महायुतीची जागांचा निर्णय झाल्यानंतर अनेकजण परत येतील. उमेदवार जाहीर झाल्यानंतर इनकमिंगचं प्रमाण जास्त असेल असा दावा शरद पवारांनी केला आहे.