प्रताप नाईक, कोल्हापूर : शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात कुठून होते. त्याला एक परंपरा आहे. बाळासाहेबांची या ठिकाणची एक सभा ऐतिहासिक ठरली. आणि त्या सभेनंतर शिवसेनेत विजयाची परंपरा सुरू झाली, म्हणूनच आजही शिवसेना प्रचाराचा नारळ याच ऐतिहासिक शहरातून फोडते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूर यांचं अतूट नातं. बाळासाहेब ठाकरे निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करायचे. कोल्हापूरच्या आंबाबाईचं दर्शन झालं की निवडणुकीआधीचा महाराष्ट्र दौरा सुरू व्हायचा. तीच परंपरा कायम ठेवत उद्धव ठाकरेही प्रचाराचा नारळ कोल्हापुरातच फोडतात. म्हणूनच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातूनच रणशिंग फुंकण्यात यावं. या शिवसेनेच्या मागणीला भाजपनंही होकार दिला. २४ मार्चला कोल्हापुरातून रणशिंग फुंकण्याची तारीख ठरली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदावार संजय मंडलीक यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्याचा शिवसेनेला यंदा वचपा काढायचा आहे. पण शिवसेनेचे अनेक नेते हे शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करतील का, याबद्दल मंडलिकांनाच संशय आहे. तर दुसरीकडे भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिकांच्या प्रचारात उतरले आहेत. आता या सगळ्या कोल्पापुरी मिसळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातल्या नेते, कार्यकर्त्यांना काय तंबी देणार. यावर कोल्हापूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे.