Pankaja Munde Shown Black Flags By Maratha: भारतीय जनता पार्टीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान मराठ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. बीड जिल्ह्यामधील वेगवेगळ्या गावांना गाठीभेटी देणं सुरु आहे. पंकजा मुंडेंनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यानिमित्तानेच त्या धाकटी पंढरी नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीश्रेत्र संस्था नारायणगडमधील श्रीनगर नारायण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शन घेऊन पंकजा मुंडे गडावरुन खाली उतरताना साक्षाळ पिंपरी येथे मराठा बांधकांनी काळे झेंडे दाखवले. यावेळेस 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मात्र पंकजा यांचा ताफा न थांबता येथून निघून गेला.
अशाप्रकारे सकल मराठा समाजाकडून प्रचारादरम्यान निषेध नोंदवण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रिणिती शिंदेंच्या प्रचार दौऱ्यामध्येही सातत्याने मराठा समाजाकडून विरोध होताना दिसत आहे. गुरुवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील सरकोलीमध्ये मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदेंच्या गावभेटीस विरोध केला होता. या प्रकरणावरुन प्रणिती शिंदेंनी थेट भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला होता. आपल्याला मराठा समाजाकडून जो विरोध केला जात आहे त्यामागे भाजपा आहे, असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला आहे.
मात्र प्रणिती शिंदेंच्या प्रचारादरम्यान आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांमागे भाजपा असल्याचा आरोप भाजपाने फेटाळून लावला आहे. भाजपा इतक्यावर थांबला नसून प्रणिती शिंदेंनी केलेले आरोप सिद्ध केले नाहीत तर त्यांना मतदारसंघात फिरु देणार नाही असा इशारा दिला आहे. प्रणिती शिंदेंकडे कार्यकर्तेच नाहीत. त्या उगाच भाजपावर खापर फोडत असल्याचा आरोप पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी केला आहे. तसेच प्रणिती यांनी केलेले आरोप पुराव्यांसहीत सिद्ध करुन दाखवावे असे आवाहनही हळणवर यांनी केले आहेत. प्रणिती शिंदेंना हे आरोप सिद्ध करता आले नाहीत तर त्यांनी माफी मागावी. माफी मागितली नाही तर त्यांना भाजपाही मतदारसंघामध्ये फिरु देणार नाही असंही हळणवर यांनी सांगितलं आहे. प्रणिती शिंदेंना मराठा समाजाकडून मागील काही दिवसांमध्ये अनेकदा विरोध झाला आहे. प्रचारासाठी प्रणिती शिंदे वेगवेगळ्या गावांना भेटी देत असताना त्यांना मराठ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.
नक्की वाचा >> पवारांना शह देण्यासाठी महायुतीचा खेळी! NCP विरुद्ध NCP सामना; अजित पवार गटात शिंदेंचा शिलेदार
अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून निवडणुकीच्या माध्यमातूनही निषेध नोंदवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करण्याचा सकल मराठा समाजाचा मानस असून त्यासाठी गावागावांमध्ये बैठकी घेतल्या जात आहेत.