Loksabha Election 2024: छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकमधून भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र इथं त्यांची वाट सोपी नाही, कारण भुजबळांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
असं असलं तरीही भुजबळांनी मात्र घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवाय अजित पवारांनीही भुजबळांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी ही भूमिका घेतलीय. येत्या 48 तासात याबाबतचा निर्णय होणार आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना चर्चेचा अधिकार आहे, त्यामुळं पुढील दोन दिवसात निर्णय होईल अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना उमेदवार यादीतील नावासंदर्भात भुजबळांनी काही महत्त्वाची वक्तव्य केली. आपलं नाव माध्यमांमुळंच चर्चेच आल्याचं म्हणत अद्यापही जागावाटपासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून, चर्चा सुरुच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नाशिकच्या जागेसाठी अनेकांनीच दावा केल्याचं म्हणत सध्या राष्ट्रवादी गोषवारा घेत असल्याचं सांगत ठरेल त्या उमेदवरा ठरेल त्याच्या पाठीशी तिन्ही पक्ष खंबीरपणे उभे असतील असं भुजबळांनी सांगितलं.
महायुतीचा नव्यानं भाग होऊ पाहणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेविषयीसुद्धा भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. हा पक्ष महायुतीचा भाग झाल्यामुळं कुठेही पेच प्रसंग झाला नसून उलटपक्षी महायुतीचीच ताकद वाढणार असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. ते अडचण निर्माण करण्यासाठी आले नाहीयेत, सध्या राज ठाकरे वरिष्ठ पातळीवर चर्चा करत असल्याचं सांगत त्यांनी महायुतीतील घडामोडींमध्ये डोकावण्याची संधी अनेकांना दिली.