Yogi Adityanath In Nitin Gadkari Rally: महाराष्ट्रातील पहिल्या टप्पात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. यामध्ये नागपूरचाही समावेश असून सध्या या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उभे असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. याच प्रचारसभेमध्ये सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते. पश्चिम नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची रॅली झाली. यावेळेस त्यांनी उत्तर प्रदेशमधील कामगिरीबद्दल बोलताना एक सूचक विधान केलं. आपण सत्तेत आल्यापासून उत्तर प्रदेशमध्ये एकही दंगल झालेली नाही असं सांगताना योगी आदित्यनाथ यांनी कारणाचाही खुलासा केला.
योगी आदित्यनाथ यांनी गडकरींच्या प्रचारसभेमध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सभा घेताना तेथील लोक ज्यांनी रामाला आणले त्यांनाच सत्तेत आणण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे, असं आदित्यनाथ म्हणाले. मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सरकार सत्तेत असल्याने 500 वर्षांचा वनवास संपला आणि राम मंदिर उभं राहिलं. यंदाच्या वर्षी रामलल्ला खऱ्या अर्थाने अयोध्येत होळी खेलले. हा आमच्यासाठी फारच भाग्याचा क्षण होता. हे सारं केवळ मोदी सरकारमुळे शक्य झालं असं आदित्यनाथ म्हणाले.
आपल्या कार्यकाळामध्ये उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती फारच सुधारल्याचा हवाला योगी आदित्यनाथ यांनी दिला. "उत्तर प्रदेशमध्ये आता संचारबंदी लागत नाही. इथे आता कावडयात्रा काढली जाते. आधी आमच्या मुली शिक्षणासाठी राज्याबाहेर जायच्या. मात्र आता गुन्हेगार आणि गुंड राज्यसोडून जात आहेत. इथे सर्वांसाठी वातावरण अगदी सुरक्षित आहे," असं योगी आदित्यनाथ म्हणाले. "मागील सात वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात एकही दंगल झालेली नाही. कारण दंगा करणाऱ्यांना (आता) हे चांगले माहिती आहे की उलटे टांगले जाईल," असं सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी कायदासुव्यवस्थेसंदर्भात बोलताना केलं. मोदी सरकारच्या अनेक योजनांची माहितीही योगी आदित्यनाथ यांनी दिली.
योगी आदित्यनाथ यांनी नितीन गडकरींवरही स्तृतीसुमनं उधळली. गडकरींनी देशभरामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मोठं योगदान दिल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. जगभरामध्ये बांधकाम क्षेत्राच्याबाबतीत भारताची चर्चा होताना दिसत आहे. मागील 10 वर्षांमध्ये या श्रेत्रात भारताने जी प्रगती केली आहे त्यात गडकरींचं योगदान फार मोठं आहे. त्यांच्याकडे नाही हा शब्दच नाहीये, असं म्हणत गडकरी कधीच निराश करत नाहीत असं योगी आदित्यनाथ म्हणाले. गडकरींनी प्रत्येक राज्याला कोट्यवधींचा निधी देत कामं करुन घेतली. राजकीय क्षेत्रातही कोणीच गडकरींविरुद्ध नकारात्मक बोलत नाही. ते राजकारणामधले अजातशत्रू व्यक्तीमत्व असून असा खसदार मिळणं हे नागपूरकरांचं नशीब आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
नक्की वाचा >> 'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..'
योगी आदित्यनाथ यांनी सभेला संबोधित केलं तेव्हा त्याठिकाणी नितीन गडकरी, माजी आमदार सुधाकर देशमुख, परिणय फुके, माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान मोदी सरकारच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. नितीन गडकरी यांनीही मतदारांना संबोधित केले.