LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघार

भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता. 

शिवराज यादव | Updated: Apr 18, 2024, 11:47 AM IST
LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघार title=

LokSabha Election: भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता. शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला होता. त्यात नारायण राणेंनी या जागेवर हक्क सांगितला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण अखेर शिंदे गटाने माघार घेतली असून, भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तेरावी यादी जाहीर केली आहे. या यादीत नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख आहे. दरम्यान भाजपाने ही यादी जाहीर करण्याच्या काही वेळ आधीच शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली तर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा देऊ असं जाहीर करत अप्रत्यक्षपणे माघार घेतली होती. यानंतर नारायण राणेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढतील हे स्पष्ट झालं होतं. ही पत्रकार परिषद संपताच भाजपाने नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली. 

दरम्यान महाविकास आघाडीने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे येथे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होईल हे स्पष्ट झालं आहे.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली माघार

उदय सामंत यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांचे बंधू किरण सामंतही उपस्थित होते. किरण सामंत यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा असेल अशी पोस्ट करत आधीच माघार घेण्याचे संकेत दिले होते. 

पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितलं की, "गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा सुरु आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाबात 8 दिवसांपूर्वी किरण सामंत यांनी पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर भाजपाच्या एका नेत्याने त्या संदर्भातील निर्णय थोड्या दिवसांनी घ्यावा अशी विनंती केली होती. त्यामुळे काल संध्याकाळपर्यंत यासंदर्भात चर्चा सुरु होती".

पुढे ते म्हणाले की, "मीदेखील 4 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनुष्यबाणाला जागा मिळावी अशी विनंती केली होती. तसंच किरण सामंत यांचं नाव घेत सर्व आकडेवारी सादर केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो होतो. काल रात्री पुन्हा एकदा सर्वांशी चर्चा झाली. अमित शाह यांच्याशीही चर्चा करण्यात आली. तिकीट वाटपावर चर्चा सुरु असताना उद्या फॉर्म भरण्याची वेळ आहे. अशा स्थितीत अद्यापही उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे या बैठकांनंतर एकनाथ शिंदे, फडणवीस यांना त्रास होऊ नये यासाठी किरण सामंत यांनी नारायण राणेंना जरी उमेदवारी जाहीर झाली तरी शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करु अशी भूमिका घेतली आहे. नारायण राणे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत. आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी, उद्या फॉर्म भरताना नाराणय राणेंसह राहू"