Sanjay Raut on LokSabha Vote Counting: काँग्रेसला (Congress) 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तसंच नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्या वाराणसी (Varanasi) मतदारसंघात पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे असंही ते म्हणाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत एनडीएला बहुमत मिळेल असं दिसत नाही असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. एक्झिट पोलवर टीका करताना त्यांनी हे सर्व मोदी मीडिया पोल होते अशी टीका केली आहे.
"ते सर्व मोदी मीडिया पोल होते. तो गुजरातच्या व्यापाऱ्यांचा शेअर बाजार होता. तो आज कोसळताना दिसत आहे. आम्ही सातत्याने देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन होईल असं सांगत आहोत. आता फक्त कल सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे देशाचे पंतप्रधान पहिल्या 3 फेरीत पिछाडीवर होते, हाच कल आहे. जो लागायचा तो निकाल लागेल. पण प्रत्यक्ष भगवान, ईश्वराचे अवतार, काशीपुत्र हे 3 फेऱ्यात पिछाडीवर होते. हा उत्तर प्रदेश नव्हे तर देशाचा कल आहे. 2 वाजता चित्र स्पष्ट होईल," असं संजय राऊत म्हणाले आहेत. जर नरेंद्र मोदी पिछाडीवर राहिले असतील तर हाच ट्रेंड आहे. अजिंक्य, अजेय आणि ईश्वराचे अवतार वाराणसीत पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे अशी टीकाही त्यांनी केली.
"इंडिया आघाडी झपाट्याने पुढे जात आहे. एक्झिट पोलमधील आकड्यांच्या पुढे गेला आहे. काँग्रेसला 150 जागा मिळतील. मागील निवडणुकीत 50 जागाही मिळाल्या नव्हत्या. म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ सुरु झाला असं मी समजतो. आमचा जो अभ्यास आहे त्यानुसार महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील. इंडिया आघाडीला 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. कोणत्याही परिस्थितीत एनडीएला बहुमत मिळेल असं दिसत नाही. 4 वाजता चित्र स्पष्ट होईल. भाजपाने जो प्रोपगंडा केला होता तो चुकीचा, भंपक होता हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल," असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.