दीपक भातुसे, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मावळमधील उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दबाव वाढताना दिसून येत आहे. पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत, असे खुद्द शरद पवार यांनी जाहीर केले होते. असे असले तरी मावळमधून त्यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी शरद पवारांवर दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवारच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे.
शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शनिवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत मावळमधून पार्थ पवार यांनाच उमेदवारी देण्याची मागणी जयंत पाटील यांनी शेकापतर्फे शरद पवार यांच्याकडे केली आहे.पार्थ यांना मावळमधून उमेदवारी मिळावी यासाठी राष्टावादीतूनही शरद पवार यांच्यावर दबाव वाढत आहे. पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत, असे शरद पवारांनी जाहीर केल्यानंतर पक्षाने मावळसाठी उमेदवाराचा शोध सुरू केला होता. त्यात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचे नाव पुढे आले होते. पक्षातर्फे त्यांना तशी विचारणाही झाली होती. मात्र पार्थ पवार यांना इथून निवडणूक लढवायची असून मावळमधील जनसंपर्क दौरे त्यांनी सुरूच ठेवले आहेत.
दुसरीकडे पार्थने निवडणूक लढवावी, अशी अजित पवार यांचीही इच्छा आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पार्थच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे विधान दोन दिवसांपूर्वी केलं होतं. तर शनिवारी शेकापचे जयंत पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेऊन पार्थला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. या वाढत्या दबावामुळे मावळमधून पार्थ पवार यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.