मुंबई : flood situation in Konkan : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात पुराचा मोठा तडाका बसतो. ही पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.
वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात होणार होणार आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्याबाबत नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक यांत्रिकी विभागाची यंत्रणा आणि मोठ्या मशिनरी खरेदी प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागाला तातडीने वर्ग करण्याच्या सूचना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून अनेक ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. कोकणात मूळात पावसाचे प्रमाण जास्त असते. गेल्या काही वर्षात कोकणाला सातत्याने अतिवृष्टीचा फटका बसत आहे, असे पवार म्हणाले.
कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे त्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पूरस्थितीचा फटका नदीकाठावरील गावांना, शहरांतील नागरी वस्त्यांना वारंवार बसत आहे. नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिलेत.
पूरस्थितीमुळे कोकणातील नद्यांच्या काठी पूरस्थिती निर्माण होऊन शहरे, गावातील नागरी वस्त्यांचे, नदीकाठच्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. वारंवार होणारे हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. चिपळूण शहराला असणारा पुराचा धोका टाळण्यासाठी वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम आता करण्यात येणार आहे.