Maharashtara Rain : रायगड आणि कोकण विभागात तुफान बरसणाऱ्या पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी ये रे ये रे पावसा असं म्हणणारे अनेकजण आता मात्र जा रे जा रे पावसा असा सूर आळवताना दिसत आहेत. पण, हा पाऊस मात्र इतक्यात राज्यातून काढता पाय घेताना दिसत नाहीये.
हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी रायगड, पालघर, पुणे, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांसाठी राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं इथं हवामान खात्यानं जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, इरई, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट दिल्यामुळं वरंध घाटातील रस्त्यावर मुरूम मातीचे ढिगारे टाकून रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे पुणे- रायगड जिल्ह्याच्या सीमेवर रस्ता बंद केला आहे .पुढील आदेश येईपर्यंत भोर मार्गे महाडला जाणार वरंधा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली असतानाच अनेकांचेच पाय आता पावसाळी पर्यटनस्थळांकडे वळताना दिसत आहेत. लोणावळा, अंबोली, माथेरान, भिवपुरी, इगतपुरी या आणि अशा अनेक ठिकाणी पावसाळी सहलीसाठी जाण्याऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे. पण, मुसळधार पावसाचा आनंद घेत असताना नागरिकांनी बेसावध राहू नये आणि हुल्लडबाजी टाळावी असं आवाहन यंत्रणाकडून करण्यात आलं आहे. बऱ्याच धबधब्यांच्या ठिकाणी आणि घाटमाथ्यांवरी रस्त्यांवर वाहतुक पोलीसहबी नजर ठेवून आहेत. त्यामुळं यंत्रणांना सहकार्य करत पावसाचा आनंद घ्या इतकंच सांगणं.