मुंबई : भाजपाने विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आता शिवसेना आपल्या विधिमंडळ नेतेपदी कोणाची निवड करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पुढे केले जात आहेत. तसेच सत्तेत समान वाटा यावर देखील शिवसेना ठाम आहे. त्यामुळे विधीमंडळ नेतेपदाची माळ आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात पडेल अशी चर्चा आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उद्या शिवसेना भवनात होणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामार्तब होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गटनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा असली तरी तुर्तास अनुभवी एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांची बैठक संपल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत करणार नावाची घोषणा करु शकतात.