रत्नागिरीत भगवाच, राष्ट्रवादीने एक गमावली दुसरी खेचून आणली

कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत.  

Updated: Oct 24, 2019, 03:05 PM IST
रत्नागिरीत भगवाच, राष्ट्रवादीने एक गमावली दुसरी खेचून आणली

मुंबई : कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत. रत्नागिरीत शिवसेनेचे राजन साळवी (राजापूर), उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (गुहागर) आणि योगेश कदम (दापोली) यांची विजयी आघाडी. चिपळूणमधून शेखर निकम (राष्ट्रवादी) विजयी झाले आहेत. बंडखोरीचा फटका हा शिवसेनेला बसला आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीने यश मिळवले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण 

सिंधुदुर्गात भाजपचे नितेश राणे आणि रत्नागिरीतील चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी मोठा विजय मिळवला आहे. निकम आणि तटकरे या प्रथमच आमदार होत आहे. तर खेड-दापोलीमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे योगशे कदम हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. त्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना जोरदार दे धक्का दिला आहे. तेही पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहेत. काही अपवाद वगळता कोकणात शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांनी मोठा विजय संपादन केला आहे. त्यांना १ लाख १८ हजार ४८१ मते मिळालीत. तर राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांना ३१ हजार १८ मते मिळालीत. उदय सामंत यांनी ८७ हजार ४६२ मताधिक्यांनी विजय संपादन केला आहे. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत जोरदार जल्लोष साजरा केला.

राजापुरात पुन्हा भगवा

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून राजापूर मतदार संघ ओळखला जातो. या मतदारसंघात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारे अनेक जण आहेत. येथील मतदार हा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिला आहे. राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी ११ हजार मतांनी विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजपचा उमेदवार उभा होता. या ठिकाणी भाजपने कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे राजन साळवी यांनी जास्त मताधिक्य घेता आले नाही. भाजचे अविनाश लाड यांनी काहीवेळा आघाडी घेतली होती. त्यामुळे साळवी यांना चांगलाच धक्का बसला होता. तसेच अविनाश सौंदाळकर हेही मैदानात होते.

चिपळूणमध्ये राष्ट्रवादीची बाजी

चिपळूणमधून राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले आहेत. तेही पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहेत. या ठिकाणी विद्यमान सदानंद चव्हाण यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तिवरे येथील धरण फुटल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. तसेच या धरणाचे बांधकाम त्यांच्या कंपनीने केले होते. तसेच शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्याने पोखरल्याने धरण फुटल्याचा दावा केला होता. त्यामुळे जोरदार टीका झाली होती. याचा फटकाही शिवसेनेला या ठिकाणी बसला आहे.

खेड-दापोली आणि गुहागर

खेड-दापोली मतदार संघातून प्रथमच शिवसेनेचे योगेश कदम विजय झालेत. शिवसेना मंत्री रामदास कदम यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे रामदास कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेती होती. या ठिकाणी राष्ट्रवादीने आपली जागा गमावली आहे. येथून संजय कदम पराभूत झाले आहेत. तर गुहागरमध्ये अतितटीची लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव यांनी कमी फरकाने विजय मिळवला आहे. या ठिकाणी शिवसेनेला फायदा झाला आहे. हा मतदारसंघ भाजपचा होता. मात्र, भास्कर जाधव हे राष्ट्रवादीत असताना त्यांनी भाजपला पराभूत केले होते. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला आहे.