इतक्यात सरकार स्थापन होणार नाही; आणखी थोडा वेळ लागेल- पवार

अनौपचारिक गप्पांदरम्यान शरद पवारांनी हे वक्तव्य केले.

Updated: Nov 15, 2019, 08:43 PM IST
इतक्यात सरकार स्थापन होणार नाही; आणखी थोडा वेळ लागेल- पवार title=

नागपूर: राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार नाही. त्यासाठी आणखी थोडावेळ लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार सध्या राज्यभरात फिरत आहेत. यावेळी नागपूरात असताना त्यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान हे वक्तव्य केले. यावेळी १७ नोव्हेंबरला राज्यात सत्तास्थापना झाल्यावर नवा इतिहास रचला जाईल, असे उपस्थितांपैकी एका व्यक्तीने म्हटले. त्यावर शरद पवार यांनी लगेचच १७ तारखेला नाही आणखी थोडावेळ लागेल, असे म्हटले. त्यामुळे शिवमहाआघाडी सरकारचा शपथविधी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी शक्यता आता मावळली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरु आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या विचासरणीत असलेल्या मुलभूत फरकामुळे ही चर्चा फार हळूहळू पुढे सरकत आहे. सध्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून किमान समान कार्यक्रमाची आखणी सुरु आहे. जेणेकरून सरकार स्थापन झाल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत कोणतेही हेवेदावे होणार नाहीत. त्यामुळे या किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींची मोहोर उमटल्यानंतरच सर्वजण राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जातील. 

यापूर्वी राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, यापैकी एकाही पक्षाला बहुमताचा आकडा राज्यपालांसमोर सादर करता आला नव्हता. परिणामी राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. त्यामुळे १३ तारखेपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व असा राजकीय पेच उभा राहिला आहे.