Maharashtra Weather News : जवळपास अर्धा जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर जुलै महिन्याचा उत्तरार्ध जवळ असताना राज्यात पावसानं पुन्हा जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण-गोवा आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्येसुद्धा ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
कोकणासोबतच (Konkan Rain) मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरासह विदर्भातही जोरदार पावसाची शक्यचा वर्तवण्यात आली आहे. सध्या गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा समांतर पट्टा सक्रिय असल्यामुळं महाराष्ट्रपासून आंध्र प्रदेशापर्यंत पावसाचा जोर वाढलेला दिसेल.
पावसाच्या एकंदर स्थितीवरून राज्यात सध्या सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, साराता, सांगली, रायगड, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील भिलजी, बोरघर, रामराज परिसरात रविवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसाने गावातील घरांमध्ये कंबरभर पाणी झालं असून अनेक वाहनंही पाण्याखाली गेली. अचानक झालेल्या पावसाने ग्रामस्थांची अक्षरशः तारांबळ उडाली. घरातील अन्नधान्य, इतर वस्तू भिजून नुकसान झालं. गावाशेजारून छोटी नदी वहात असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. तर, तिथं नेहुली खंडाळा परिसरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावातील 6 ते 7 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. पावसामुळे गावानजीक असणारा नाला ओसंडून वाहू लागला आणि त्याचे पाणी गावात शिरले. गावातील रस्त्याला नाल्याचे स्वरूप आलं होतं.
राजापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने राजापूर बाजारपेठेत चार फूट पाणी साचलं. त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत असून दुकानातील साहित्य इतर सुरक्षित ठिकाणी हलविल्याने कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त नाहीय. दरम्यान राजापूर तालुक्यातील अनेक गावांचा एक दुसऱ्या गावाशी संपर्क तुटला आहे.
तर, रायगडच्या महाड तालुक्यातील वाळण भागातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं काळ नदी दुथडी भरून वाहू लागली. तर सांदोशी, वारंगी, वाळणमध्ये रस्त्यांवरून ओढ्यांचं पाणी वाहू लागलं. तसंच वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. त्याचवेळी सांदोशी, बौद्धवाडी आणि वाघोली गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला.