Mumbai Rain Update: मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. रात्रीच्या झोपेत अनेकांच्या हे लक्षात आले नसले तरी पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झालेयत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय.
जोरदार कोसळलेल्या पावसामुळे लोकल ट्रॅकवर पाणी साचलंय. याचा परिणाम लोकल सेवांवर झालाय. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल उशीराने धावत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन बंद असून भांडुप आणि कुर्ला रेल्वे पाणी साचले आहे. या स्थानकांवर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेय. ठाणेपर्यंत ट्रेन जात असल्या तरी उशीराने धावत आहेत. तसेच रेल्वे रुळावर पाणी साचले आहे.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसाचा लोकल सेवांवरच नव्हे तर एक्सप्रेसवरही परिणाम झालाय. पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पावसामुळे सिंहगड आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ALERT--Due to Heavy Rain In Mumbai Suburban & Harbour Line Train Traffic Delay Due To Watter Logging.
Effected Station- CSMT- CHF-LTT.— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 7, 2024
नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसवर याचा परिणाम झालाय त्या खूप उशीराने धावत आहेत. तसेच सेवाग्राम एक्सप्रेस मुंबईऐवजी नाशिकवरून सोडण्यात आली आहे. तर पावसामुळे विदर्भ एक्सप्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस यांच्यावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे पावसाने ठप्प झाली आहे. सायन कुर्ला दरम्यान ट्रॅकवर पाणी आल्याने येथील वाहतूक ठप्प तर मानखुर्द जवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने हार्बर ठप्प झालीय. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर ही मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सायन माटुंगा दरम्यान पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे.