दुष्काळग्रस्तांपाठोपाठ सीमा भागातले पेट्रोलपंप चालक आक्रमक, चलो कर्नाटकचा नारा

सीमाभागातल्या Petrol Pump व्यवसायाला घरघर कारण... कर्नाटकात जाण्याचा इशारा देत महाराष्ट्र सरकारकडे केली मोठी मागणी  

Updated: Dec 6, 2022, 08:47 PM IST
दुष्काळग्रस्तांपाठोपाठ सीमा भागातले पेट्रोलपंप चालक आक्रमक, चलो कर्नाटकचा नारा  title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली :  सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातल्या 42 गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये (Karnataka) जाण्याचा इशारा दिला आहे. आता त्या पाठोपाठ सीमा भागातले पेट्रोल पंप चालकही (Petrol Pump Owner) आक्रमक झाले असून त्यांनीही कर्नाटक मध्ये जाण्याचा नारा दिला आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्रपेक्षा इंधन (Fuel) दर स्वस्त असल्याने, सीमा भागातल्या वाहनधारकांकडून कर्नाटकमध्ये जाऊन इंधन घेतलं जातं. त्यामुळे सीमा भागातल्या पेट्रोल पंपांना घरघर लागली आहे.

सीमाभागातील पेट्रोलपंप चालक आक्रमक
सांगली जिल्ह्यातल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर (Maharashtra-Karnataka Border) असणाऱ्या जत (Jat) तालुक्यातल्या 42 गावांनी पाण्याच्या मागणीसाठी थेट कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात रान पेटले. आता हा पाण्याचा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संपेल, अशी चिन्ह सध्या निर्माण झालेली असताना सीमा भागातला आणखी एक प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप धारकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सीमा भागातल्या पेट्रोल पंप धारकांनीही आता कर्नाटक मध्ये जाण्याचा नारा दिला आहे.

कर्नाटकमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त
सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर जवळपास 28 पेट्रोल पंप आहेत. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील पेट्रोल-डिझेल पंपांचा यामध्ये समावेश आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून पंप चालवताना पंप मालकांची मोठी आर्थिक कुचुंबना होत आहे. त्याला कारण आहे, महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक राज्यात मिळणार स्वस्त पेट्रोल आणि डिझेल. त्यामुळे बहुतांश वाहन धारक हे सीमा भागातल्या महाराष्ट्र हद्दीतील पेट्रोल पंपांवर इंधन घेण्यापेक्षा, काही अंतरावर जाऊन कर्नाटक हद्दीतल्या पेट्रोल पंपांवर इंधन घेणं पसंत करतात.

हे ही वाचा : 'कन्नडिगांच्या राड्यामागे काँग्रेस-जेडीएसचा हात' भाजपाचा गंभीर आरोप

सांगलीतल्या पेट्रोल पंप व्यवसाय अडचणीत
महाराष्ट्र हद्दीत पेट्रोल वाहनधारकांनी पाठ फिरवल्याने पाच ते सहा पेट्रोल पंप गेल्या तीन चार वर्षांमध्ये बंद झाले आहेत. तर काही पेट्रोल पंप सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सीमा भागातील पेट्रोल पंप धारकांकडून देशांमध्ये एकसमान इंधनाचे दर असावेत किंवा सीमा भागातल्या पेट्रोल पंपांना महाराष्ट्र सरकारकडून अनुदान देण्यात यावं, नसेल तर राज्य सरकारने कर कपात करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

पाण्यापाठोपाठ पेट्रोल पंप व्यवसायाचा एक वेगळाच प्रश्न आता समोर आला आहे. आर्थिक संकटात सापडेल्या पेट्रोल पंप धारकांना महाराष्ट्र सरकारने मदतीचा हात द्यावा, अन्यथा महाराष्ट्रातील पेट्रोल व्यवसाय कर्नाटक मध्ये घेऊन जाऊ,असा इशारा सीमा भागातल्या पेट्रोल पंप धारकांकडून देण्यात येत आहे.