Maharashtra Rain News : मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसताना दिसत आहे. मंगळवारी मुंबई आणि नजीकच्या किनारपट्टी भागातून काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहराला ओलंचिंब केल्याचं पाहायला मिळालं. पुढील 48 तासांचा आढावा घ्यायचा झाल्यास, आयएमडीच्या वृत्तानुसार येणारे दोन दिवसही पावसाचेच असणार आहेत.
पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार 5 आणि 6 जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 6 जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.
4Jul:IMD GFS indicate;likly of hevy-very hevy RF ovr westcoast on 5,6Jul,with RF intensity moving to N Konkan on 6th. Int of Mah me RF
IMD GFS नुसार 5,6 जुलै,पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.6 ला तीव्रता उत्तर कोकणात सरकणार.राज्याच्या अातल्या भागात मध्यम पाऊस pic.twitter.com/6hEncy81LF— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2023
राज्यात सुरु असणाऱ्या पावसामुळं वाहतुकीवरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. तिथं मुंबई- गोवा महामार्गावर आणि काही घाटमाथ्यावरील वळणवाटांच्या रस्त्यांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढत असल्यामुळं नागरिकांना सत्रकतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुसळधार पावसामुळं मुंबई लोकल रेल्वे वाहतुकीवरही थेट परिणाम दिसून येत आहेत.
दरम्यान, या पावसामुळं मान्सूनदरम्यानच्या पर्यटनाला चालना मिळताना दिसत आहे. पालघर, कर्जत, कोकण, अलिबागच्या दिशेनं येणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे.
महाराष्ट्रात काहीशा धीम्या गतीनं आलेला मान्सून अद्यापही राज्याच्या काही भागांमध्ये पूर्णपणे सक्रिय झालेला नसल्यामुळं या भागांमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. इथं पाऊस आला खरा, पण तो फार काळ टीकलाच नाही. ऐन मोसमातच पावसानं दडी मारल्यामुळं आता वर्ध्यातील बळीराजा हतबल झाला आहे. तिथं वाशिममधयेही परिस्थिती वेगळी नाही. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के पेरण्या झाल्या आहेत. 4 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानं पिकं धोक्यात आली होती. पण, पुन्हा पावसाची चिन्ह दिसली आणि शेतकऱ्याला दिलासा मिळाला.