65 वर्षीय अजित पवार म्हणतात, 'माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे'

Maharashtra Politcis : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 80 ते 85 वयोगटातल्या नेत्यांनी थांबलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 5, 2024, 09:32 AM IST
65 वर्षीय अजित पवार म्हणतात, 'माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे' title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'हाय प्रोफाईल ड्रामा' सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ताब्यात घेण्याच्या लढाईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यात टीका टिप्पणी सुरु आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार आरोप करत आपला गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिल्याची चर्चा सुरु आहे.

मी जे बोलतो ते वस्तुस्थितीला आधारित असते. मी काही लेचापेचा नाही. परखडपणे बोलण्याची धमक माझ्यात आहे. खरेच सांगतो वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांना पुन्हा एकदा नाव न घेता लगावला. हे काही राजकीय व्यासपीठ नाही. माझी भूमिका मी लवकरच राजकीय व्यासपीठावर मांडणार आहे, असे सांगून अजित पवार यांनी पक्षीय विरोधकांबाबतचा सस्पेन्स आणखीनच वाढवला आहे. नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे ''सुविचार मंच''तर्फे सुविचार गौरव पुरस्कार वितरण पार पडला त्यावेळी अजित पवार बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार?

"मी काही लेचापेचा नाही, जी वस्तूस्थिती आहे ती बोलणारा माणूस आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचं आणि तुमच्या पाठीमागे वेगळं बोलायचं असं मी करत नाही. तुम्ही मागे फिरल्यावर दुसरंच काहीतरी बोलायचं, असं माझ्याकडे चालत नाही. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही. हे तुम्ही लक्षा घ्या. तुम्ही जर गेल्या 30-35 वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की आता या लोकांनासुद्धा संधी दिली पाहिजे आणि या 80-85 वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं किंवा सल्ला देण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे," असे अजित पवारांनी म्हटलं.

पितृतुल्य गुरुंना निवृत्त होण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावतील - अमोल कोल्हे

दरम्यान याआधी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका केली होती. "प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला होता. आज मात्र पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावतील? जनता सूज्ञ आहे. एखाद्या पक्षाने जर प्रभू श्रीरामांवर आपला अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तरीही मी हे सांगू इच्छितो की प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत. प्रत्येकाच्या हृदयात आहेत. चार खांद्यावर जातानाही जय राम श्रीराम जय जय राम असं म्हटलं जातं. दोन माणसं भेटतात तेव्हा राम राम म्हणतात. माणसं जोडणारा राम भारताच्या मनात आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर रामभक्त ते मान्य करणार नाहीत," असं अमोल कोल्हेंनी म्हटलं होतं.