मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.

राजीव कासले | Updated: Sep 30, 2024, 03:47 PM IST
 मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला? title=

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलं होतं. मात्र आता विधानसभेसाठी मनसे (MNS) स्वबळावर लढणार आहे. विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) 220 ते 240 जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी घोषित केलं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. राज ठाकरे यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला.

मनसे फडणवीसांविरोधात लढणार?

मनसेनं नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केलीय. राज ठाकरेंनी नागपूरमधील सर्व 6 विधानभा जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिल्याचं स्थानिक मनसे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित पाठोपाठ मनसेही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तुषार गिरे हे या मतदारसंघातून मनसेतर्फे निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

भाजपची प्रतिक्रिया

मनसेच्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला उमेदवार देण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. मनसेने अगोदरच निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात 225 उमेदवार देतील, त्यामुळे उमेदवार देतील हे अपेक्षित होतं असं संदीप जोशी यांनी म्हटलं आहे. मला कोणीतरी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न होतो आहे का? पण प्रयास हमेशा शेर को घेरने का ही होता है, देवेंद्र फडणवीस शेर आहेत. 50 हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने ते निवडणूक येतील असंही संदीप जोशी यांनी म्हटलंय.

अमित ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतल्या माहीम, भांडुप, दिंडोशी,कलिना, चांदीवली किंवा मागाठणेमधून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र भांडूप विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरेंसाठी सर्वात सुरक्षित मानला जातोय.. तसा अहवालसुद्धा मनसे नेत्यांनी राज ठाकरेंना दिल्याचं समजतंय. भांडूप विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी खासदार मनोज कोटक यांच्यासह दोन स्थानिक पदाधिका-यांची नावं चर्चेत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला पाठिंबा पाहता अमित ठाकरेंना भांडूपमधून उमेदवारी दिल्यास भाजप हा मतदारसंघ सोडेल असा अंदाज आहे..

भांडूपशेजारच्या जवळचा मतदारसंघ असलेल्या विक्रोळीतही मनसेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे अमित ठाकरेंनी भांडूपमधून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. मिनी कोकण अशी भांडूपची ओळख आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे भांडूपमधून विधानसभेच्या आखाड्यात उभे राहिले तर मालवणी मतदार त्यांना साथ देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..