Maharashtra Poltics : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी बोलताना गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, असेही गणपत गायकवाड यांनी म्हटलं होतं. विरोधकांनी देखील यावरुनच मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केलं. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्याचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एका गुंडांसोबत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
याआधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचाही फोटो खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याचा एका गुडांसोबतचा फोटो शेअर केल्याने खळबळ उडाली आहे.
"शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा.. ठाणे पुणे परिसरात हत्या,अपहरण,सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे..अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत! पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी! गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य!," असे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा..
ठाणे पुणे परिसरात हत्या,अपहरण,सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे..अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत!
पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी!… pic.twitter.com/bHZnasDtQY— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
रोहित पवारांची टीका
"गुंडच सरकारसोबत फोटोसेशन करतात, मंत्रालयात रिल्स बनवतात, भाजपाचे आमदार पोलिस ठाण्यात गोळ्या घालतात आणि आता भाजपाच्या नगरसेवकावर गोळ्या झाडल्या… हे सगळं पाहिल्यावर ‘सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा?’ असं म्हणायची वेळ आलीय.. गृहमंत्री महोदय राज्यातील जनतेला आपल्या मागदर्शनाखाली अजून काय काय पहावं लागणार आहे?," अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.