विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) मराठवाड्यात (Marathwada) महायुतीला मोठा फटका बसला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप शिवसेना आघाडीने मराठवाड्यात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र 2024 मध्ये महायुतीला (Mahayuti) संभाजीनगरची एक जागा वगळता कुठंही यश मिळवता आलं नाही. लोकसभेत महायुतीला बसलेला हाच फटका विधानसभेत बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. आणि त्याच फायदा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मिशन मराठवाडा सुरू केलंय. मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत. 2019 मध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार होते त्यावर एक नजर टाकुया..
मिशन मराठवाडा
पक्षीय बलाबल 2019 - एकूण जागा - 46
भाजप - 16, शिवसेना - 12, काँग्रेस - 8, राष्ट्रवादी काँग्रेस - 8, शेकाप - 1, रासप - 1
तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता 46 विधानसभांमध्ये कोणत्या पक्षाने बाजी मारलीय त्यावर एक नजर टाकुया..
महाविकास आघाडीला 34 विधानसभा जागांवर आघाडी होती. महायुतीला केवळ 12 जागांवर आघाडी होती. तर एमआयएमला 2 विधानसभांमध्ये आघाडी होती
राजकीय पक्षांचं 'मिशन मराठवाडा'
आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या दृष्टीने पहिली सभा संभाजीनगरात घेतली. शरद पवारांनी संभाजीनगर 36 तासात तब्बल आठपेक्षा जास्त कार्यक्रम, बैठका घेतल्या. जयंत पाटलांनी बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या भागात मॅरेथॉन बैठका घेतल्या. राजू शेट्टींनी स्थापन केलेली शेतकरी आघाडी सध्या मराठवाड्यात सर्व जागा लढवण्याची चाचपणी करतेय. प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सांगता संभाजीनगरमध्येच होणाराय. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संभाजीनगरच्या सिल्लोडला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राहाणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी भाजप विस्तारकांच्या बैठका संभाजीनगरात सुरू केल्यात
'मिशन मराठवाडा' का ?
राजकीय पक्षांनी मिशन मराठवाडा का हाती घेतलाय ते समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या वादाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो अशी चर्चा आहे. पक्ष फुटीमुळे मराठवाड्यात 46 पैकी 22 जागांवर नवे चेहरे द्यावे लागण्याची शक्यता आहे. लोकसभेत सत्ताधाऱ्यांच्या पराभवामुळे इतर इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या जास्त असल्याने राजू शेट्टी यांनी याच मुद्द्यावर मराठवाड्यात एन्ट्री केलीय. तर मनोज जरांगे मराठवाड्यात जास्त उमेदवार उभे करणार, त्यामुळं विरोधकांना संधी असल्याची चर्चा आहे
लोकसभेचा निकाल पाहाता सर्वच पक्षांनी मिशन विधानसभा सुरू केलंय खरं. मात्र कोणत्या पक्षाचं मिशन फत्ते होणार हे विधानसभांच्या निकालांनंतरच स्पष्ट होणाराय.