दुर्देवी! एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आईच्या साडीने गळफास घेतला

एसटी संपामुळे पगार नाही असं सांगून वडिल आंदोलनात गेले, आणि इकडे मुलाने...

Updated: Jan 20, 2022, 02:04 PM IST
दुर्देवी! एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आईच्या साडीने गळफास घेतला title=

अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर  : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचं आहे असं सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली.  अमर तुकाराम माळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अवघ्या २० वर्षांचा होता. हा दुर्दैवी प्रकार सोलापूरमधल्य कोंडी इथं घडला. 

'दोन-तीन महिने पगार नाही'
अमर माळीचं दयानंद महाविद्यालयात 12 वीपर्यंत शिक्षण झालं आहे.तो गेल्या काही दिवसात शांत शांत बसत होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली. पण वडिल तुकाराम माळी यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. संपामुळे दोन तीन महिने पगार नाही, काम बंद आहे तुला पैसे कुठून देऊ असं वडिलांनी हताश होऊन सांगितलं.

वडिल आंदोलनासाठी गेले आणि...
अमरशी बोलणं झाल्यावर वडिल तुकाराम माळी आंदोलन सुर असलेल्या ठिकाणी निघून गेले. अमरही काही कामासाठी घराबाहेर गेला. दुपारी अमर आल्यानंतर आीने त्याला जेवणाचा आग्रह केला. पण आराम करायचा असल्याचं सांगत अमर न जेवताच स्वत:च्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी अमर बाहेर न आल्याने आईने आवाज दिला. पण खोलीतून कोणताही प्रतिसाद आला आहे.

अमरने घेतला टोकाचा निर्णय
अमर खोलीतून कोणताच प्रतिसाद देत नसल्याचं आईने मोठ्या मुलाला ही गोष्ट सांगितली. मोठ्या भावानेही अमरला आवाज दिला. पण आतून कडी लावण्यात आली होती. शेवटी मोठ्या भावाने खिडकीतून आत पाहिलं असता अमरने आईच्या साडीने गळफास घेतला होता. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अमरला खाली उतरवलं. त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच अमरचा मृत्यू झाला होता.

वडिलांनी फोडला हंबरडा
एसटी आंदोलनात गेलेल्या वडिलांना अमरच्या भावाने ही गोष्ट सांगताच ते घरी आले. माझा पगार झाला नसल्याने तुला पैसे देता आले नाहीत असं सांगत त्यांनी हंबरडा फोडला. 

अमरचं 12 सायन्स पर्यंतचे शिक्षण झाले होते.तो अभ्यासात हुशार होता त्याने असे कसे काय केले हे कळत नाही अशी चर्चा त्याच्या मित्रांमध्ये आहे.