Maharashtra Vidhan Sabha Election: राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. महायुतीबरोबरच महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील बैठका आणि चर्चांसंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतानाच आता महायुतीच्या जागावाटपात भाजपलाच झुकते माप दिले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून या घोषणेनंतर जागावाटप, उमेदवारांची यादी यासंदर्भातील घडामोडींना वेग आलाय. अशातच आता महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागावाटपासंदर्भातील चर्चेसाटी दिल्लीला जाण्याची शक्यता असतानाच ही बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपात भाजपलाच झुकते माप दिले जाऊ शकते. विधानसभेच्या जागावाटपात भाजपला जास्त जागा दिल्या जातील. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना, 'भाजपनं मोठा त्याग केला' अशी आठवण करुन दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दुसरीकडे जागावाटपाबाबत अंतिम चर्चेसाठी महायुतीमधील तिन्ही प्रमुख नेते दिल्ली वारी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीची दुपारीची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर काही प्रमुख नेते संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जातील. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. महायुतीच्या पत्रकार परिषदेनंतर ते दिल्लीला रवाना होतील. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज संध्याकाळपर्यंत दिल्लीला रवाना होतील. आज दिल्लीत या तिन्ही नेत्यांची अमित शाहांसोबत जागावाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत सर्व बाबींवर अंतिमत निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, जागावाटपासंदर्भात बोलताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होत आहे. मागील वेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने लढलो त्यावर चर्चा करणार आहोत. ज्या जागेवर भाजपाचे उमेदवार निवडून आणू शकतो नाहीत अशा जागांसंदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत," असं बावनकुळे म्हणाले.