कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर

Pokharbav Ganesh Temple Kokan: कोकणातील देवळे- मंदिरे यांचाही एक वेगळाच इतिहास आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदिराना भेट देणे हा वेगळाच अनुभव आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 24, 2024, 06:39 PM IST
कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर title=
maharashtra village konkan tourism Pokharbav Siddhivinayak Ganpati Temple Dabhole how to go

Pokharbav Ganesh Temple Kokan: कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. कोकणातील समुद्रकिनारी आणि गर्द हिरवाईने नटलेली परिसर हे पाहताच एखादा व्यक्ती त्याचा संपूर्ण थकवा विसरुन जाईल. कोकणाने अनेक गूढ आपल्या पोटात दडवलेली आहेत. निळाशार समुद्र आणि गर्द हिरव्या रानातील कोकण पाहणे म्हणजे स्वर्गसुख आहे. तुम्ही कोकणात भटकंतीसाठी निघाले असाल तर तेथील मंदिरे अवश्य पाहा. जागोजागी तुम्हाला अनेक देवळे व राऊळे दिसतील. आज आम्ही तुम्हाला कोकणातील अशाच एका गणपती मंदिराबाबत सांगणार आहोत. या मंदिराला जणू निसर्गाचाच अद्भूत चमत्कार लाभला आहे. 

निसर्गरम्य परिसरात अनेक देवळे वसलेली आहेत. इथल्या बहुतांश भागातील मंदिरांबाबत दंतकथा, गूढकथा चिकटलेल्या आहेत. कोकणातील पोखरबाव हे मंदिरही तशेच आहे. गावापासून आडवाटेला असलेले मंदिर, पाण्याचा संथ वाहणारा प्रवाह, पक्ष्यांचा चिवचिवाट असं सुंदर वातावरण येथे पाहायला मिळते. या मंदिराच्या बाजूलाच एक डोंगर आहे. मात्र, त्याला नैसर्गिकरित्या एक छिद्र पडले आहे. त्याच्या खालून एक ओढा वाहत असतो. डोंगर पोखरला गेला असल्यामुळं म्हणून पोखर आणि खाली तळे, ओहोळ आहे म्हणून बाव. त्यामुळे हे स्थान पोखरबाव म्हणून ओळखले जाऊ लागले. 

पोखरबाव गणेश मंदिरात गणेशाची मूर्ती काळ्या पाषणातील आहे. मूर्ती चतुर्भूज असून आसनावर बसलेली आहे. त्याच्या पायाशी वाहन उंदीर आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हा पोखरबावचा गणेश पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. 

कुठे आहे हे मंदिर

देवगड पासून १३ कि. मी. अंतरावर असलेले पोखरबाव गणपती मंदिर अत्यंत देखणे असे देवालय आहे. दाभोळे गावापासून २ किमीवर हे ठिकाण आहे. मंदिराच्या आसपासचा १५-२० कि. मी. अंतरावरील परिसर आंब्याच्या बागांनी सजलेला आहे. या मंदिरात आल्यानंतर निसर्गाच्या कुशीत आल्यासारखे वाटते. 

मंदिराच्या आजूबाजूचे वातावरण खूपच प्रसन्न आहे. मंदिराच्या बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तसंच, मंदिरात शंकराची स्वयंभू पिंड आहे. या स्वयंभू पिंडाबाबत एक दंतकथा सांगितली जाते. महादेवाची ही पिंडी हजारोवर्षे पाण्याखाली होती.1999 साली पुजारी श्रीधर राऊत यांना दृष्टांत झाला. त्यानंतर त्यांनी  ही मूर्ती पाण्याखालून काढली आणि तिची प्राणप्रतिष्ठा गेली. 

मंदिराच्या बाजूने पाण्याचा ओढा सतत वाहत असतो. हे पाणी नितळ आणि स्वच्छ आहे. भक्त हे पाणी तीर्थ म्हणून वापरतात. अत्यंत जागृत हे देवस्थान आहे. पोखरबावचा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.