Gautam Gambhir Press Conference : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पाचवा सामना आणि शेवटचा सामना हा 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
सिडनी टेस्टपूर्वी झालेली पत्रकार परिषद टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा ऐवजी गौतम गंभीरने घेतली. साधारणपणे संघाचा कर्णधार टेस्ट सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकारांशी संवाद साधतात. जेव्हा रोहित ऐवजी हेड कोच गंभीर पत्रकार परिषद घेण्यासाठी आला तेव्हा त्याला रोहितच्या गैरहजेरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की सर्वकाही ठीक आहे आणि पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षकाची उपस्थिती पुरेशी असावी.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सिडनी टेस्टमध्ये खेळणार की नाही याबाबत सस्पेंस अजूनही कायम आहे. रोहित बॉर्डर गावसकर ट्रॉफीची शेवटची टेस्ट खेळणार की नाही हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. हेड कोच गंभीरने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, 'रोहित सोबत सगळं काही ठीक आहे, मला वाटत नाही की पत्रकार परिषदेत त्याच्या अनुपस्थितीबाबत कोणतीही चर्चा व्हायला हवी. हेड कोच इथे आहे आणि ते पुरेसं आहे. उद्या विकेट पाहून आम्ही प्लेईंग 11 निवडू'.
हेही वाचा : टीम इंडियाला धक्का, सिडनी टेस्टमधून बाहेर झाला 'हा' स्टार खेळाडू, गंभीरने केलं कन्फर्म
मेलबर्न टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीरने टीम इंडियाला ड्रेसिंग रूममध्ये येऊन झापलं होतं. ड्रेसिंग रूममध्ये झालेलं बोलणं हे काही सूत्रांनी मीडियापर्यंत पोहोचवलं ज्याची खूप चर्चा झाली. यावरून पत्रकार परिषदेत गंभीरने सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये झालेलं बोलणं हे सार्वजनिक व्हायला नको होतं. मी खेळाडूंशी प्रामाणिकपणे संवाद साधला कारण त्यांचा परफॉर्मन्सच त्यांना संघात ठेऊ शकतो. ड्रेसिंग रूममधील तणावाच्या बातम्यांदरम्यान गौतम गंभीर म्हणाला की ते फक्त रिपोर्ट्स आहेत, सत्य नाही. गौतम गंभीर म्हणाला, 'प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील चर्चा फक्त ड्रेसिंग रूममध्येच राहिली पाहिजे आणि मी कठोर शब्द वापरले हे फक्त रिपोर्ट्स आहेत, सत्य नाही.
गौतम गंभीरने म्हटले की, "जो पर्यंत ईमानदार लोक ड्रेसिंग रूममध्ये आहेत तो पर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातांमध्ये आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट ड्रेसिंग रूममध्ये ठेऊ शकते आणि ती म्हणजे तुमचा परफॉर्मन्स. मी खेळाडूंशी प्रामाणिकपणे बोललो आणि प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे". गंभीर म्हणाला की त्याचं विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या वरिष्ठ खेळाडूंशी टेस्ट सामना जिंकण्याच्या रणनीतिबाबत बोलणं झालं आहे.
3 ते 7 जानेवारी दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना हा सिडनी येथे पार पडणार आहे. टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.