Maharashtra Weather Updates : अवकाळीचं वातावरण सरत असलं तरीही राज्यावर असणारे पावसाचे ढग मात्र पाऊस आता येतोय की नंतर याचीच भीती निर्माण करताना दिसत आहेत. सध्या सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं हवामानाची प्रणाली बदलत असून, राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला आहे. तर काही भागांमध्ये सातत्यानं तापमानात चढ उतार होताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये उन्हाचा दाह वाढत असून, पहाटेच्या वेळी मात्र इथं हवेत गारवा जाणवत आहे.
उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण कमी झालं असून, इथं 155 नॉट्स वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील तापमानावर याचे थेट परिणाम होणार असून, किमान तापमानाच अंशत: घट होईल. तर, उन्हाचा दाह मात्र अधिक प्रमाणात जाणवेल.
मुंबईच्या हवेत पहाटेचा गारवा कायम असला दुपारी उन्हाचा चटका जाणवणार आहे. पहाटेच्या वेळचा गारवा आणि दुपारी कडाक्याचं ऊन या साऱ्यामुळं मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामानातील या बदलांना नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.
उत्तर भारतात पश्चिमी झंझावात नव्यानं सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पहाटेची थंडी जाणवू शकेल. दुपारच्या वेळी सापेक्ष आर्द्रता साधारण 26 टक्के राहणार असून, वायव्येकडून वारे पुन्हा तीव्र वेगानं वाहणार आहेत. ज्यामुळं पहाटेच्या वेळी गारवा आणि दुपारी उष्णतेचं चित्र पाहायला मिळेल.