Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमधून उसंत घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा कोकण आणि घाटमाध्यावर पावसानं जोर पकडला असून, पुढील 24 तासांमध्ये इथं पावसानं वातावरणात प्रचंड गारवा निर्माण होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावरील भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पावसाची शक्यता आहे.
मुंबईत पुढील 24 तासांमध्ये शहर आणि उपनगरात अधनूमधनू मध्यम पावसाच्या सरींची हजेरी असून, आकाश अंशतः ढगाळ राहील. मधूनच उघडीप देणाऱ्या पावसामुळं शहरातील किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रता प्रचंड वाढत असल्याचं जाणवू शकतं. त्यामुळं नागरिकांना या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढचे दोन दिवस विदर्भ ,मध्य महाराष्ट्र ,खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता असून, कोकणामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिथं पश्चिम महाराष्ट्रातही ल पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड मध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.