Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon Updates) राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो अतिशय वेगानं कक्षा रुंदावताना दिसला. पण, हाच मान्सून काही दिवसांनंतर मात्र उत्साह मावळावा त्याप्रमाणं मंदावला आणि त्याची आगेकूच थांबली. इथं मान्सूनचा वेग मंदावल्यामुळं चिंता वाढलेली असतानाच आआता पुन्हा एकदा या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरी कोसळत असून, पुढील 24 तासांत राज्याच्या (Konkan Coast) कोकण किनारपट्टी भागासह (Pune, Satara, Kolhapur) सातारा, पुणे, कोल्हापूरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह साधारण ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मध्यम स्वरुपातील पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/YSXbuoRDce
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 19, 2024
दरम्यान, मोसमी वाऱ्यांची एकंदर दिशा आणि त्यांचा वेग पाहता, हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंतच्या किनारपट्टीसाठी पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. थोडक्यात आठवड्याचा शेवट हा पावसाच्यात उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरसह राज्याच्या किनारपट्टी भागावर काळ्या ढगांची चादर आणि मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेनं नागिरकांना हैराण केलं होतं. पण, आता मात्र पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळं त्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढच्या वाटचालीस पोषक वातावरण आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं मान्सून पुढं वाटचाल करतोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.